कोल्हापुरात 20 लाखांच्या बनावट नोटा जप्त

लोकसभा निवडणुकीच्या काळात नोटा खपवण्याचा होता कट

कोल्हापूर – लोकसभा निवडणूक काळात बनावट नोटा खपवण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने बाचणी येथे छापा टाकून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून वीस लाख रुपयांच्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत ही माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

लोकसभा निवडणूक काळात बनावट नोटा चलनात आणण्याचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणाऱ्या टोळीचा प्रयत्न आज कोल्हापूर पोलिसांनी हाणून पाडला. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत कागल तालुक्‍यातील बाचणी इथं छापा घातला आणि चौघांच्या टोळीकडून 20 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसच काही खऱ्या नोटा आणि नोटा छापायची यंत्रसामग्री असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे तसेच महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांनी संयुक्तरित्या सीमा भागात सुद्धा तपासणी नाके उभारले आहेत ही सर्व सुरक्षायंत्रणा भेदून या टोळीने वीस लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा निवडणूक काळात चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस दल हादरून गेले.

या प्रकरणी बाळू सुलेमान नायकवडी ,प्रवीण नारायण गडकर, विक्रम कृष्णात माने, आणि गुरुनाथ दादू बामणे या चौघांना अटक केलीय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब पवार राजेंद्र सानप सचिन पंडित युवराज आठरे यांच्यासह पोलिस कर्मचारी अमोल कोळेकर राजेंद्र हांडे नितीन चोथे जितेंद्र भोसले संजय पडवळ संदीप कुंभार संतोष पाटील रणजित कांबळे सचिन पाटील रविंद्र कांबळे तुकाराम राजगिरे नामदेव यादव अनमोल पवार अजय काळे आनंद गडे सुरेश गुरव वैशाली पाटील नीलम कांबळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)