1993 मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा नागपुरात मृत्यू

नागपूर – मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटतील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा बुधवारी नागपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अब्दुल गनी हा नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल गनी आजारी होता. त्याच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात अब्दुल गनीने सेंचुरी बाजारात बॉम्ब ठेवला होता. अब्दुल गनी हा एक टॅक्‍सी ड्रायव्हर होता. त्याने सेंचुरी बाजारात मॅनहोल खाली आरडीएक्‍स लावल्याचा आरोप होता. या मॅनहोलवरुन एक बस जात असताना मोठा स्फोट झाला. यामध्ये 113 जणांचा मृत्यू झाला, तर 227 जण जखमी झाले होते. या प्रकरणी अब्दुल गनीला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेचे रुपांतर करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुंबईत 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाने संपूर्ण देशाला हादरा बसला होता. हा स्फोट घडवून आणण्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, याकूब मेनन आणि त्याचा भाऊ टायगर मेननचा हात होता. मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवणाऱ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन अद्यापही फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)