1991 : बाळासाहेब विखे वि. यशवंतराव गडाख

बाळासाहेब विखे हे नगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ. त्यांचे वडील कै. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. राजकारण आणि सहकाराचा वारसा बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद हे टप्पे पार करत बाळासाहेब कॉंग्रेस पक्षातर्फे 1971 मध्ये कोपरगाव मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 77, 80, 84 आणि 89 अशा सलग चार निवडणुका विखे यांनी या मतदारसंघातून जिंकल्या. शेती आणि सहकारी साखर कारखानदारीचा विशेष अभ्यास असलेल्या बाळासाहेबांनी पक्षाच्या दिल्लीतील वर्तुळात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. 1989 मध्ये बोफोर्स आणि राम जन्मभूमी मुद्द्यावरून कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेब विखे यांनी पक्षाच्या पराभवाची चर्चा पक्षांतर्गत व्यासपीठावर व्हावी यासाठी एका फोरमची स्थापना केली. पक्षात अधिक लोकशाही यावी हा या फोरम स्थापण्यामागचा उद्देश आहे असे बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते.

बाळासाहेबांच्या या फोरमला त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, फोरम स्थापन करण्याचा बाळासाहेबांचा निर्णय पक्षाच्या हायकमांडला रुचला नाही. त्यामुळे 1991 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. संतापलेल्या बाळासाहेबांनी कोपरगाव ऐवजी शेजारच्या नगर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात कॉंग्रेसने यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली होती. बाळासाहेबांनी सायकल हे निवडणूक चिन्ह घेतले होते. बाळासाहेब जरी कोपरगावचे खासदार होते तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे जिल्हाभर विणलेले होते. त्यामुळे नगर दक्षिण मतदारसंघातून त्यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते बाहेर पडले होते. विखे यांना या प्रचारादरम्यान मतदारांमधून मोठा प्रतिसाद मिळत होता. ते पाहून कॉंग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख व त्यांचे समर्थक चांगलेच अस्वस्थ झाले होते.

गडाख यांच्या प्रचारासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवू नका असे फर्मान पक्षाने सोडले होते. त्यामुळे ही लढत रंगतदार बनत चालली होती. गडाख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत पवारांनी केलेले एक विधान त्यांना आणि यशवंतराव गडाखांना भविष्यात चांगलेच भोवले. प्रतिस्पर्धी उमेदवार (म्हणजेच बाळासाहेब विखे) सायकली वाटतो आहे असे कळले आहे. त्याच्याकडून सायकली घ्या, मत मात्र गडाखांनाच द्या. असे विधान पवारांनी या सभेत केले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत यशवंतराव गडाख हे अवघ्या 12 हजार मताधिक्‍याने निवडून आले. बाळासाहेब विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रचार सभेतील वक्‍तव्याचा आधार घेत गडाख यांची निवड रद्द ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. पवार यांनी केलेल्या वक्‍तव्यामुळे आपली बदनामी झाली आणि आपण पराभूत झालो असा दावा विखे पाटील यांनी आपल्या याचिकेत केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने विखे पाटील यांचे म्हणणे ग्राह्य धरत यशवंतराव गडाख यांची निवड अवैध ठरवली. हा ऐतिहासिक निकाल 1993 मध्ये दिला गेला. मुंबई उच्च न्यायालयाने विखे पाटील यांना विजयी घोषित करावे असाही आदेश दिला होता. गडाख यांच्या तर्फे या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. सर्वोच्च न्यायालयाने गडाख यांची निवड अवैध ठरवली. मात्र विखे यांना विजयी घोषित करण्याऐवजी या मतदारसंघात नव्याने निवडणूक घ्यावी असा आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)