चुरशीच्या लढती : 1984 : रामकृष्ण मोरे वि. संभाजीराव काकडे

काळ असा होता की पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्याप्रमाणेच संभाजीराव काकडे यांचाही अनुयायी वर्ग मोठा होता. 1977 मध्ये जनता पक्षातर्फे बारामतीतून खासदार झालेले संभाजीराव कार्यकर्त्यांमध्ये “लाला’ म्हणून ओळखले जात. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात म्हणजेच खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये संभाजीरावांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. पवारांच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव तालुक्‍यात शरद सहकारी बॅंक चालू केल्यावर काकडेंच्या कार्यकर्त्यांनी लाला सहकारी बॅंक चालू केली होती. अगदी खेडोपाड्यापर्यंत संभाजीरावांचे कार्यकर्ते होते.

1984 मध्ये शरद पवारांनी पुढची विधानसभा डोळ्यापुढे ठेवून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. स्वतः पवार बारामतीतून लढणार म्हटल्यावर संभाजीरावांना मतदारसंघ कोणता, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावेळी पवारांचा समाजवादी कॉंग्रेस आणि जनता पक्ष यांची युती झालेली होती. मग संभाजीरावांनी खेड मतदारसंघात रामकृष्ण मोरे यांच्या विरोधात लढावे असा निर्णय झाला. मोरे विरुद्ध काकडे ही लढत प्रचंड चुरशीची झाली. कार्यकर्त्यांच्या अफाट परिश्रमाच्या जोरावर संभाजीरावांनी सत्तारूढ कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या रामकृष्ण मोरे यांना विजयासाठी झगडायला लावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखेरच्या फेरीपर्यंत काकडे यांनी मोरेंना लढत दिली. सत्तारूढ पक्षाचे उमेदवार असल्यामुळे मोरे यांच्याकडे पैसा आणि साधनसामग्रीची कमी नव्हती. काकडेंकडे त्याचीच वानवा होती. मात्र कार्यकर्त्यांच्या जिद्दीपुढे कॉंग्रेसची धनशक्‍ती आणि साधनसामग्री फिकी ठरली. देशभर “राजीव लाट’ असतानाही रामकृष्ण मोरे यांना मात्र विजयासाठी झगडावे लागले. मोरे या लढतीत विजयी झाले; मात्र त्यांचे मताधिक्‍य होते अवघे 16 हजार. या चुरशीच्या लढतीच्या आठवणी अजूनही ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये निघतात. संभाजीरावांचे शिष्य किसनराव बाणखेले यांनी 1989 च्या निवडणुकीत मोरे यांना पराभूत करत काकडेंच्या पराभवाचा वचपा काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)