1952 तारकेश्‍वरी सिन्हा : 26 व्या वर्षी खासदार

– अंजली महाजन 

भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या बिहारच्या तारकेश्‍वरी सिन्हा या केवळ 26 व्या वर्षी संसद सदस्या बनल्या. आजच्या काळात कदाचित ही गोष्ट सामान्य वाटेल; पण आजपासून 70 वर्षांपूर्वीचा काळ, त्यावेळचा महिलांसंदर्भातील सामाजिक मतप्रवाह-मानसिकता यांचा विचार केल्यास यातील महत्ता लक्षात येईल. 1952 मध्ये त्यांनी पाटणा पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. केवळ कुणाच्या तरी सांगण्यावरून-वरदहस्तामुळे किंवा घराणेशाहीचा वारसा घेऊन त्या खासदार बनल्या नाहीत; तर संसद सदस्या बनल्यानंतर त्यांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली.

तारकेश्‍वरी सिन्हा जेव्हा लोकसभेमध्ये एखाद्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात करत असत तेव्हा संपूर्ण संसदेत शांतता असायची. त्यांच्या संसदेतील भाषणांमध्ये नेहमी वेगवेगळे शेर, शायरी असायची. त्यांना हजारो शेर तोंडपाठ होते. एकदा प्रख्यात गीतकार गुलजार यांनी असे म्हटले होते की, त्यांच्या “आंधी’ या चित्रपटातील जीवनप्रवास हा तारकेश्‍वरी सिन्हा यांच्या जीवनावर प्रेरित आहे.

1958 ते 1964 या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थ राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. वित्तमंत्रालयात काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला मंत्री होत. तारकेश्‍वरींचे वडील शिवनंदन प्रसाद सिंह हे पाटण्यातील ख्यातनाम शल्यचिकित्सक होते. शिवनंदन यांना एकच कन्या. तारकेश्‍वरींचे पती निधीदेव सिंह हे देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक होते. लंडनहून शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर तारकेश्‍वरी राजकारणात सक्रिय झाल्या. 19-20 वर्षे वयातच विद्यार्थी संघटनांच्या राजकारणामध्ये मोठे नाव कमावलेल्या तारकेश्‍वरी यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला.

जीवनप्रवास : तारकेश्‍वरींचा जन्म 26 डिसेंबर 1926 रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. 1943 मध्ये त्यांचा विवाह निधीदेव सिन्हा यांच्याशी झाला. 1957, 1962 आणि 1967 मधील लोकसभेच्या निवडणुका जिंकून त्या सलग तीन वेळा खासदार बनल्या.

1971 मध्ये कॉंग्रेस ओ आणि 1977 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली; पण त्या पराभूत झाल्या. 1980 नंतर त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करली. 14 ऑगस्ट 2007 रोजी त्यांचे देहावसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)