विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली

तळेगाव ढमढेरे-श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पाण्याखाली पूल गेल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पश्‍चिम पट्ट्यामध्ये संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून नदीकाठी असणाऱ्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
भामा आसखेड आणि चासकमान धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने या धरणाचे पाणी खेड मार्गाने भीमा नदीला मिळाले असून आज दिवसभर नदी दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर्षी पाऊस चांगला पडला असल्यामुळे महाराष्ट्रातील मोठी धरणे 100 टक्के भरत आलेली आहेत. पाण्याची पातळी वाढली असून नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. भामाआसखेड आणि चासकमान धरणांच्या पाण्याचा धोका लक्षात घेता काही दरवाजातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आज सकाळपासूनच भिमा नदीवरील वढू बुद्रुक 161, पेरणे 92, बुर्केगाव 73, विठ्ठलवाडी सांगवी सांडस 99, पाठेठाण 86, शिवतक्रार म्हाळुंगी 145, वडगाव 42, आलेगाव पागा 158 घनफूट क्षमतेचे सर्व बंधारे दुथडी भरून वाहू लागल्याने शिरूर दौंड, हवेली, या तालुक्‍यातील नदीकाठच्या लगतच्या काही गावांचा संपर्क तुटल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले.
विठ्ठलवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेला पाटेठाण, सांगवी सांडस येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यामुळे आज शाळेत येता आले नाही. अनेकांनी दूर अंतरावरून येणे पसंत केले; परंतु अनेकांना वेळेत पोहाचताच आले नसल्याने कामगार वर्गास सुट्टी काढावी लागली. काही दुचाकीचालक जीव धोक्‍यात घालून बंधाऱ्यावरून ये-जा करत होते. बंधाऱ्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी कर्मचारीवर्ग नसल्याने धोका पत्कारून काही लोक जीव धोक्‍यात घालून प्रवास करताना दिसत होते. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न यावर्षी भेडसावणार नाही असा अंदाज दिला जात आहे.

  • इंद्रायणी नदीवरील आंद्रा आणि वडिवळे तसेच भामाआसखेड चासकमान ही धरणे भरली असून पाणी 22,700 क्‍युसेक वेगाने विसर्ग होत आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहत असताना बंधाऱ्यावरून ये-जा करू नये. सर्व धरणे 100 टक्के भरल्यामुळे पावसाचे पाणी कमी जास्त सोडले जाऊ शकते यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे.
    -जे. डी. संकपाळ, शाखाधिकारी कोंढापुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)