सुरक्षारक्षकांच्या हातावर नगरसेवकांनी दिला टिपऱ्यांचा “प्रसाद’

– सभागृहात ढोल नेण्याला मज्जाव करणे भोवले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी महापालिका मुख्यसभेत ढोल वाजवून आंदोलन केले. हे ढोल सभागृहात नेण्यापासून मज्जाव करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर टिपरी मारण्याचा प्रताप एका नगरसेवकाने केल्याचा प्रकार यावेळी दिसून आले. कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षारक्षकाला अशाप्रकारे प्रसाद मिळाल्याने आंदोलनासाठी नगरसेवक मारण्याचेही कृत्य करू शकतात, हे या निमित्ताने दिसून आले. सुरक्षारक्षकांच्या अस्तित्त्वच सध्या टांगणीला लागल्याने ते याबाबत कोणाकडेच तक्रार न करता मूग गिळून गप्प बसले.

सकाळी 11.30 वाजता महापालिकेची मुख्यसभा सुरू झाली. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत ढोल आणले. याची जबाबदारी एका माजी मनसे नगरसेविकेने घेतली होती. हे ढोल छत्रपत्री शिवाजी महाराज सभागृहाजवळ आणले. त्यावेळी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी हे ढोल सभागृहात नेण्याला मज्जाव केला. सुरक्षा रक्षक हे ढोल प्रवेशद्वारामधून आत नेऊ देत नव्हते आणि आतले आंदोलक नगरसेवक ते ढोल आत ओढत होते, असा प्रकार काहीवेळ तेथे सुरू राहिला.

सुरक्षा रक्षक ढोल आत नेऊ देत नसल्याचे पाहून, ढोल वाजवण्याची टिपरी एका नगरसेवकांने सुरक्षा रक्षकांच्या हातावर मारण्याला सुरूवात केली. या आंदोलनात सुरक्षा रक्षकाला विनाकारण या टिपरीचा मार खावा लागला.
आधीच सुरक्षा रक्षक कमी करणार असल्याने त्यांच्यावर गंडांतर आले आहे. असे असताना या कृत्याची तक्रार करायचे झाल्यास किंवा त्याविरुद्ध बंड पुकारल्यास नोकरी जाण्याची भिती असल्याने या सुरक्षा रक्षकांना मूग गिळून आणि मार खाऊन गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र केवळ आपले इप्सित साध्य करण्यासाठी नगरसेवकांचे अशाप्रकारचे वर्तन मात्र लोकशाहीला कितपत रुचणारे आहे हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)