170 वर्षांची मराठी नाटकांची परंपरा अखंड

मराठी रंगभूमी दिन विशेष

– कल्याणी फडके

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – भारुड, लोकसंगीत, पोवाडा या सगळ्यांबरोबरच नाटकांची महाराष्ट्राला भव्य परंपरा आहे. आधुनिक मराठी नाटकांचे जनक विष्णूदास भावे यांनी दि.5 नोव्हेंबर 1843 रोजी सांगलीमध्ये “सीता स्वयंवर’चा पहिला प्रयोग केला आणि मराठी नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. याचे स्मरण म्हणून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 170 वर्षांची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. सध्याचे तरुण कलावंत तंत्रज्ञानाचा वापर नाटकांच्या प्रसिद्धी तसेच प्रेक्षकांना वळविण्यासाठी करत आहेत.

माझ्यातल्या कलेतला रंगभूमीने वाव दिला आहे. माझ्या नेपथ्यातून मी रंगमंचाला नेहमी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय व त्याच्यासाठीची उर्जाही रंगमंचातूनच मिळते. त्यासाठी मी रंगमंचाचा ऋणी राहीन.
– अक्षय आंबेकर, नेपथ्यकार.


रंगभूमी आणि तालमीचे ठिकाण हे आमचे दुसरे घर, तर येथील व्यक्ती म्हणजे आमचे कुटुंब. कोणतीही कलाकृती उभारताना आम्ही ती जगतो. सेट उभारताना वेगवेगळा विचार करत आम्ही सगळे प्रयत्न करतो. रंगभूमीमुळे आम्हांला आत्मविश्‍वास मिळतो.
– मनाली आफळे, प्रमुख कलावंत, “मनोयात्री’


मराठी प्रायोगिक नाटकांना व्यावसायिक नाटकांपेक्षा कमी प्रतिसाद आहे. पुणे सोडून ग्रामीण भागांत नाटकाचा प्रसार करणे गरजेचे आहे. आमच्यासारखे तरुण या क्षेत्रामध्ये काही करू पाहत आहेत. त्यांच्या कलेला आणि जिद्दीला प्रेक्षकांनी दाद द्यावी, इतकेच वाटते. व्यावसायिक नाटकांच्या दिग्गज कलावंतांप्रमाणे रसिकांनी आम्हांलाही प्रतिसाद द्यावा.
– रत्नदीप शिंदे, लेखक, “आफ्टर द डायरी’


“नाटक’ या शब्दाच्या अनेक परिभाषा आम्हाला रंगभूमीवर समजल्या. प्रायोगिक रंगमंचाची नि:स्वार्थ सेवा करताना खूप मोठी जबाबदारी आल्यासारखी वाटते. पण, ती पेलताना ओझे जाणवत नाही. सर्व गोष्टी आम्हीच मॅनेज करतांना आम्हांला जशी आर्थिक सहकार्याची अपेक्षा असते त्याचबरोबर शासकीय नाट्यगृहांचे सहकार्य मिळावे.
– ब्रह्मा हांडे, प्रमुख कलावंत, “अंधार’ 


मला घडवण्यात नाटकांचा मोठा वाटा आहे. माझ्यातील हा गुण रंगभूमीमुळे विकसित झाला. नाटक पाहणारा प्रेक्षक वर्ग नक्कीच कमी झालेला नाही. पण, नाट्यगृहांमध्ये नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग मात्र कमी झाला आहे. त्याला नाट्यगृह आणि तेथे होणारे प्रयोग हे कारण असू शकेल. पूर्वीच्या काही पिढ्यांकडे नाटक पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आता विविध माध्यमे विकसित झाल्यामुळे प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे.
– केतकी उत्पात, कलावंत, “दीपस्तंभ’


पुण्यातले भरत नाट्यमंदीर ही माझी आवडती आणि जवळची रंगभूमी आहे. आम्ही “आफ्टर द डायरी’ या नाटकाचे 20 प्रयोग केले आणि त्यापैकी 14 प्रयोग “भरत’ला केल्याने मला ही रंगभूमी जास्तच जवळची आहे. तालीम आणि प्रत्यक्षात रंगभूमीवर प्रयोग यांत फरक आहे. तेव्हा कलाकारांची भावना असते, ती अन्य कुठेच मिळू शकत नाही.
– संकेत अनगरकर, प्रमुख कलावंत, “आफ्टर द डायरी’


“तो मखमली पडदा….
अस्सल जाणिवा आणि मनातले आक्रोश …
प्रामाणिक नट, खरे मुखवटे सगळं बघायला
हिरव्या रंगमंचावर पुन्हा पाउल टाकतोय,
माझ्या दुसऱ्या माउलीच्या कुशीत’
अशीच माझी रंगभूमीबद्दल भावना आहे. मराठी नाटकांकडे सध्या तरुणाई जास्त प्रमाणात वळते आहे. प्रेक्षकांमध्ये सुद्धा तरुण जास्त आहेत. नाटकांमध्ये सुद्धा विविध प्रयोग होत आहेत. जसे की आत्ता आम्ही “हे मृत्युंजय’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वेच्छामूल्य ठेवले होते. त्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, रसिकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. काही नाटकाच्या प्रयोगाला गर्दी नक्कीच असते. नाट्यगृहांत वारंवार सांगूनसुद्धा प्रेक्षकांचे मोबाइल सुरू असतात. तेव्हा आम्हांला प्रयोग बंद करावे लागतात. कलावंत त्या कलाकृतीसाठी बरीच मेहनत घेतात.

– दिग्पाल लांजेकर, अभिनेता तथा दिग्दर्शक


आता व्यावसयिकदृष्टया या क्षेत्रात जे बदल होत आहेत, त्यामुळे नाटक घराघरात पोहोचत आहे. अगदीच तीन अंकी नाटकांना वेळ देणारा प्रेक्षकवर्ग नसेल, तरी पुन्हा एकदा नाटकाचा प्रेक्षक वर्ग वाढत आहे. एकूणच सध्याचे वातावरण पूरक आहे. ज्या रंगभूमीने आम्हांला खूप काही दिले, तिच्यासाठी आम्हीही काहीतरी योगदानात्मक नक्‍की करण्याचा प्रयत्न करू.
– सूरज पारसनीस, दिग्दर्शक, “थिएट्रोन’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)