17 शाळा विनामुख्याध्यापक

पिंपरी – शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. परंतु, पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सतरा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त असून त्या शाळांचा गाडा प्रभारी मुख्याध्यापकच हाकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळा आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. परंतु, अनेक शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकच पार पाडताना दिसत आहे. यामुळे, विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायचे का शिक्षकांवर या कात्रीत प्रभारी मुख्याध्यापक अडकलेले आहेत. महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी निश्‍चितपणे महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. या शाळांची वाढलेली गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहरातील प्राथमिक विभागातील 10 शाळांमध्ये तर उर्दू माध्यमातील सहा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. तसेच, हिंदी माध्यमातील दोन शाळांपैकी एक जागा रिक्त आहे. मात्र, इंग्रजी माध्यमातील दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे भरण्याची “कार्यतत्परता’ महापालिकेने दाखविलेली आहे.

-Ads-

शहरात महापालिकेच्या काही शाळांवरती मुख्याध्यापक नसल्याने शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्‍यता आहे. शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असल्याने त्यांचे विद्यार्थी व प्रशासन या दोन्हीकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेचे व्यवस्थापन पार पाडण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. मात्र, ही पदे कित्येक दिवसापासून रिक्त असल्याने महापालिकेचे शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्याध्यापकांची पदमान्य असलेल्या जागा भरण्यासाठी लवकरात-लवकर पाऊले उचलण्याची गरज आहे. शहरातील काही शाळांची पटसंख्या कमी असल्याने शासनाने नऊ शाळा अपात्र ठरविलेल्या आहेत. मात्र, उर्वरीत शाळांची गुणवत्ता व दर्जा टिकविण्यासाठी मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरात-लवकर भरण्याची आवश्‍यकता आहे.

महापालिकेच्या शाळेत सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात-लवकर सुरु केली जाणार आहे. याबाबत, प्रशासन विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.

उर्दू माध्यमाच्या शाळा वाऱ्यावर
एकीकडे मुख्याध्यापकांची वाणवा असताना दुसरीकडे शिक्षकांअभावी महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा देखील वाऱ्यावर आहेत. थेरगाव, दापोडी, खराळवाडी, नेहरूनगर, लांडेवाडी व रुपीनगर येथे इयत्ता नववी व दहावीचे उर्दूचे वर्ग सुरु करून तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी येथे पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. या सहा शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे 18 शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातच शासनाची मान्यता मिळालेली आहे. परंतु अद्याप या शाळांना स्वतंत्र युडायस नंबर मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा व परीक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विभागवार मुख्याध्यापकांची रिक्‍त पदे
पिंपरी : 2
सांगवी : 3
भोसरी : 5
उर्दू माध्यमांच्या शाळा : 6
हिंदी माध्यम : 1


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)