सन्मानाची वागणूक देऊ, पण पाठिशी घालणार नाही

सहायक निरीक्षक सूरज बनसोडे ः ओतूर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला
निवृत्तीनगर  -ओतूर परिसरातील वाड्या वस्त्या व गावांचा अभ्यास करता पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदार व नागरिकांना सन्मानाची वागणूक देण्यात येईल, त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन निपक्ष भूमिका घेऊन कोणालाही पाठीशी न घालता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ओतूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्‍त सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिला.
ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांची पोलीस निरीक्षकपदी बढती होऊन नागपूर शहर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी तळेगाव दाभाडे येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सूरज बाबासाहेब बनसोडे यांची जिल्हांतर्गत विनंती बदली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी ओतूर येथे केली. येथे बदली झाल्यावर बनसोडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यावेळी प्रभातशी संवाद साधताना ते बोलत होते.
बनसोडे म्हणाले, बेकायदेशीर अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. दहीहंडी, गणपती व नवरात्री उत्सव काळात कोणीही पारंपरिक वाद्य सोडून डॉल्बी अथवा डीजेचा वापर केल्यास ती वाहने जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येतील. परिसरात बसस्थानक, शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमिओच्या त्रास होणार नाही याची दखल घेणार असून निर्भया पथकामार्फत प्रभावी मोहीम राबवणार आहे. यातील कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत नाकाबंदी करून रात्रीची गस्त वाढवणार आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त असून हेल्मेट न घातल्याने प्रसंगी त्यांना जीव गमवावा लागतो. विना हेल्मेट दुचाकी चालकास त्यांना हेल्मेट वापरण्यास व त्याच्या संबंधी जनजागृती करणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.कारकिर्दीविषयी…
सूरज बनसोडे हे 2011 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून गृह विभागात नियुक्त झाले. 2011 साली त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगड येथील जंबिया गट्टा या अतिदुर्गम भागात करण्यात आली. तेथील तीन वर्षांच्या कारकिर्दीत बनसोडे यांनी त्यावेळचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक व सध्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवादी भागात नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत यशस्वी कारवाई करत दोन नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. तेथील भागात गस्त घालणे व तेथील स्थानिकांसाठी प्रत्येक महिन्याला मेळावे घेऊन त्यांना महसुली, शासकीय व आरोग्य यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी ठरत केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सेवा पदक व राज्य सरकारचे विशेष सेवापदक त्यांनी मिळवले होते. त्यानंतर त्यांची भोर व तळेगाव दाभाडे येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. तेथील अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा त्यांनी यशस्वी उकल करण्यात यश मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)