162 किलोमीटर सायकल प्रवास करीत मतदान

पोलीस आयुक्‍तालयातील लिपिक बनसोडे यांचा उपक्रम

पुणे – लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोग सामाजिक संस्था, सेलेब्रिटी आदींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलीस आयुक्‍तालयातील वरिष्ठ लिपिक किशोर शिवाजी बनसोडे यांनी पुणे (वानवडी) ते दौंडपर्यंत चक्‍क 162 किलोमीटर सायकलने प्रवास करीत लोकशाहीतील पवित्र मतदानाचा हक्‍क बजावला.

किशोर बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावातील आहेत. 1993 मध्ये किल्लारीतील भूकंपामुळे बनसोडे यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्यानंतर ते पुणे येथे शिक्षणासाठी आले. येथे आल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 2008 मध्ये बनसोडे यांना पोलीस दलात एसआरपी ग्रुप नंबर सातमध्ये पहिले पोस्टींग मिळाले. त्यानंतर 2012 ते 2016 या कालावधीत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीणमध्ये कनिष्ठ क्‍लार्क म्हणून काम केले. सध्या 2016 पासून पुणे येथे पोलीस आयुक्‍तालयात ते वरिष्ठ लिपीक म्हणून काम करीत आहेत. त्यांना ट्रेकिंगची आवड असल्यामुळे आपोआप त्यांनी सायकलींगची आवड जोपासली. ऍड. मुरलीधर कचरे यांच्या सहकार्यातून सामाजिक उपक्रमात ते हिरारीने सहभाग घेतात.

लोकसभेला मतदानाचा टक्‍का वाढावा, समाजात व्यापक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सायकलने प्रवास करून मतदान करण्याचा निश्‍चय केला. वानवडी ते दौंड हे अंतर 81 किलोमीटर आहे. वानवडी येथे स्थायिक असलेले बनसोडे यांचे दौंड शहरात आहे. त्यामुळे त्यांनी पहाटे पावणेपाचच्या सुमारास वानवडीतून दौंडकडे सायकलने प्रवास सुरू केला. सकाळी आठ वाजता दौंड शहरात ते पोहचले. त्यानंतर दौंड येथील जयजवान विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर सव्वाआठ वाजता मतदानाचा हक्‍क बजावला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता दौंडहून पुण्याकडे निघाले. ते पुण्यात साडेबाराच्या सुमारास पोहचले. या मार्गावरील एकूण प्रवास 162 किलोमीटर केला. त्यांच्या उपक्रमाचे वानवडी, दौंड शहरातील समाजसेवी संस्थांनी कौतूक केले.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी विविध माध्यमातून प्रबोधन, जनजागृती करीत आहे. या माध्यमातून आपणही मतदानवाढीसाठी पुणे ते दौंडपर्यंत 80 किलोमीटर सायकलने प्रवास करण्याचा तसेच प्रबोधन करण्याचा निश्‍चय केला. यासाठी ऍड. मुरलीधर कचरे यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासता आली.
– किशोर बनसोडे, पुणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)