श्रीलंकेतल्या साखळी बॉम्बस्फोटात 160 ठार

ईस्टर निमित्तच्या प्रार्थनासभांना केले गेले लक्ष्य

400 पेक्षा अधिक जण जखमी

तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये एकाचवेळी बॉम्बस्फोट

कोलंबो – श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशीच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये किमान 160 जण ठार झाले, तर 400 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांपैकी किमान 8 बॉम्बस्फोट तीन चर्चमध्ये आणि तीन हॉटेलांमध्ये झाले आहेत. या हॉटेलांमधील बॉम्बस्फोटांमध्ये विदेशी नागरिकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

ख्रिश्‍चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि स्फोटात मरण पावलेल्या, जखमी झालेल्यांप्रती सहवेदना व्यक्‍त केली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी तातडीची बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरातल्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या साखळी बॉम्बस्फोटांमागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र अशा स्वरुपाचे घातपाती हल्ले होण्याची शक्‍यता श्रीलंकेच्या पोलिसांनी याच्या 10 दिवसांपूर्वीच वर्तवलेली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हल्ल्याचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. आपल्या भागामधील या अमानुष हत्याकांडाला कोणतेही स्थान असता कामा नये. असे म्हणून या बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांप्रती पंतप्रधानांनी सहवेदना व्यक्‍त केली आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही श्रीलंकेतील हत्याकांडाचा तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे राक्षसी दहशतवाद आहे. या बॉम्बस्फोटाच्या वृत्तामुळे आपण व्यथित झालो आहोत. या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांप्रती आणि जखमी नागरिकांप्रती आपल्या सहवेदना आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवरील संदेशामध्ये म्हटले आहे.

या साखळी बॉम्बस्फोटांमधील पहिला स्फोट कोलंबोतील कोचसिकेड इथल्या सेंट ऍन्टोनी चर्चमध्ये झाला. दुसरा स्फोट नेगोम्बो इथल्या कातुवापितियामधील सेंट सेबास्टियन चर्चमध्ये तर तिसरा स्फोट बॅतिकॅलोबा इथल्या चर्चमध्ये झाला. याशिवाय शांग्रिला, द सिनामोन ग्रॅन्ड आणि किंग्जबेरी या पंचतारांकित हॉटेलमध्येही अशाच प्रकारचे स्फोट झाले. हे बॉम्बस्फोट स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.45 वाजता झाले. हे स्फोट झाले तेंव्हा सर्व चर्चमध्ये ईस्टर निमित्त प्रार्थनासभा सुरू होत्या. श्रीलंकेच्या एकूण 22 दशलक्ष लोकसंख्येपैकी 7.6 टक्के लोकसंख्या ख्रिश्‍चन आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्याचा उद्देश या हल्ल्यामागे असल्याचे उघड आहे. हा हल्ला श्रीलंकेला पुन्हा यादवी युद्धाच्या काळात खेचून नेण्याचा प्रयत्न आहे, असे श्रीलंकेचे अर्थमंत्री मंगला समरवीरा यांनी म्हटले आहे.

कट्टरवादी मुस्लिम संघटनेचा हात असल्याचा संशय

या साखळी बॉम्बस्फोटामागे “नॅशनल थोईथ जमाईथ’ (एनटीजे) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे. या संघटनेकडून ईस्टरच्या दिवशी देशातील प्रमुख चर्च आणि भारतीय दूतावासावर बॉम्बहल्ले केले जाण्याची शक्‍यता आहे, असा इशारा पोलिस प्रमुख पुजुथ जयसुंदरा यांनी 10 दिवसांपूर्वीच दिला होता. “एनटीजे’ ही श्रीलंकेतील कट्टरवादी मुस्लिमांची संघटना आहे. गेल्यावर्षी श्रीलंकेमध्ये बुद्धमुर्तींची तोडफोड करण्यातही याच संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.

पर्यटन व्यवसायाला फटका…
श्रीलंकेमध्ये उन्हाळ्याच्या काळात पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. आज झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे या पर्यटनाच्या हंगामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. श्रीलंकेमध्ये दरवर्षी सुमारे 23 लाख पर्यटक जगभरातून येत असतात. त्यत भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. गेल्या वर्षी 4.5 लाख पर्यटक भारतातून श्रीलंकेमध्ये आले होते. यावर्षी भारतातून सुमारे 10 लाख पर्यट श्रीलंकेमध्ये येण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जत होती.

या हल्ल्यांमुळे श्रीलंकेत दशकभरापासूनची शांतता पुन्हा भंग पावली आहे. दशकभरापूर्वी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या विभाजनवादी संघटनेने सुरू केलेल्या हिंसाचारामध्ये संपूर्ण श्रीलंका भरडून निघाली होती.

साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्या 160 जणांमध्ये 35 विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या साखळी बॉम्बस्फोटामागे हात असल्याच्या संशयावरून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सातही जणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे, असे श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवान विजेवर्दने यांनी सांगितले. आज झालेले बहुतेक बॉम्बस्फोट हे आत्मघातकी हल्लेखोरांनी घडवून आणले होते, असेही त्यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी या साखळी बॉम्बस्फोटानंतर ट्‌विट करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अशा कठिण प्रसंगी आपली एकता कायम ठेवून संयम बाळगावा, असे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)