1577 डुक्‍करे गेली कुणीकडे?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यावरुन नुकत्याच झालेल्या महापालिका सभेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनीही अधिकाऱ्यांचे कान उपटले. मात्र, पशू वैद्यकीय विभाग यातून धडा घ्यायला तयार नाही. महापालिकेच्या “रेकॉर्ड’वर मागील आठ महिन्यात 1579 डुक्‍कर पकडल्याची नोंद आहे. मात्र, दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष कोंडवाड्‌यामध्ये जात पाहणी केली असता अवघे एक डुक्‍कर तेथे पहायला मिळाले. त्यामुळे, डुक्‍कर पकडल्याच्या आकडेवारीबाबत संशय निर्माण झाला आहे. जर ही आकडेवारी खरी असेल तर उर्वरीत 1577 डुक्‍करे कुठे गेली, असा सवाल उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील “स्वाईन फ्लू’मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहचली आहे. अनेक रुग्ण खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या आजारावरील उपचारांकरिता खासगी रुणालयांमधील संशयित रुग्णांची संख्या तुलनेत अधिक असून, या उपचारांकरिता लाखो रुपये खर्च येत आहे. हा आजार संसर्गजन्य असून, डुक्‍करांच्या विषाणुंमुळे हा आजार पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डुक्‍करांविषयी भीती निर्माण झाली आहे. याशिवाय थेरगावमध्ये डुक्‍करांचा उपद्रव वाढल्याने, या प्रश्‍नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक ऍड. संजय भोसले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्‍कराचे पिल्लू सोडले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

यानंतर झालेल्या महापालिका सभेतही पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्‍न चर्चिला गेला. यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याने सभा तहकूब करावी लागली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर राहुल जाधव व महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनीही आरोग्य व पशूवैद्यकीय विभागाची कानउघडणी केली. महापालिका वर्तुळातील या सर्व घडामोडींमुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. “स्वाईन फ्लू’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मोकाट डुक्‍करांना पकडण्याबाबत पशू वैद्यकीय विभागाकडे बोट दाखवले जात आहे. याबाबत दैनिक “प्रभात’ने आढावा घेतला असता पशूवैद्यकीय विभागातील सावळा गोंधळ उजेडात आला आहे.

याबाबत, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी जानेवारी 2018 ते आजअखेरीपर्यंत 1 हजार 578 डुक्‍करे पकडण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने नेहरुनगर येथील महापालिकेचा कोंडवाडा येथे प्रत्यक्ष जात पाहणी केली असता अवघे एक डुक्‍कर याठिकाणी असल्याचे पहायला मिळाले. याबाबत याठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता हे डुक्‍कर 4 दिवसांपूर्वी डांगे चौक येथून पकडून आणले असल्याचे सांगितले. कोंडवाड्यात हे एकमेव डुक्‍कर असल्याच्या माहितीलाही त्यांनी दुजोरा दिला. अधिकारी एक तर कर्मचारी भलतीच माहिती देत असल्याने पशू वैद्यकीय विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक “प्रभात’चे सवाल
महापालिकेच्या “रेकॉर्ड’नुसार मागील आठ महिन्यात महापालिकेने 1 हजार 578 डुक्‍करे पकडली असतील तर ही डुक्‍करे गेली कुठे?, त्यांचे नेमके काय झाले?, महापालिकेच्या कोंडवाड्याची तटबंदी भेदून ही डुक्‍करे पळून गेली का?, तसे असेल तर सुरक्षा रक्षक काय करत होते, की महापालिकेकडून डुक्‍करांची परस्पर विल्हेवाट लावली जाते, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

विल्हेवाटीबाबत अधिकारी निरुत्तर
या वर्षी आत्तापर्यंत 1 हजार 578 डुक्‍करे पकडण्यात आले. मात्र कोंडवाड्यात फक्त एकच डुक्‍कर आढळून आले आहे. बाकीच्या डुक्‍करांचे काय असा प्रश्‍न पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना विचारला असता डुक्‍करांची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने टेंडर काढून जे. बी. या संस्थेस दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विल्हेवाट नेमकी कशी लावली जाते याबाबत त्यांना स्पष्ट माहिती देता आली नाही. पकडलेली डुक्‍करे कुठे जातात, त्यांचे काय केले जाते याबाबत कोंडवाड्यातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला कोणाला काहीही माहिती देण्याची परवानी नसल्याचे सांगत अधिक बोलण्यास टाळाटाळ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)