151 खांदेकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश : उपायुक्‍त

आळंदी – माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी खांदेकऱ्यांची 151 पास आळंदी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. मंदिरात जाणारी अखेरची 47 दिंडी प्रवेश करून पाठोपाठ मानाच्या खांदेकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

आळंदी देवस्थान पोलीस ठाण्यात आयोजित दिंडी चालक, मालक, पोलीस प्रशासन, देवसंस्थान यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत पाटील बोलत होत्या.यावेळी उपायुक्त चाकण विभाग चंद्रकांत अलसटवार, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, देवस्थानचे विश्‍वस्त विकास ढगे पाटील, डॉक्‍टर अभय टिळक, योगेश देसाई, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, मारुती महाराज कोकाटे, ज्ञानेश्‍वर शेटे त्याचबरोबर दिंडीकरी, मानकरी, चोपदार मालक चालक आदींसह भाविक व आळंदीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, मंदिरातील मर्यादित जागेचा विचार करून रथा पुढील 20 व रथा मागील 27 दिंडी चालकांनी प्रस्थान काळात मंदिरात प्रवेश करताना सोहळ्यातील टाळ वाजवणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.

पूर्वी पालखी सोहळ्यातील भाविकांची दिंडी कार्यांची चालकमालकांची संख्या मर्यादित असल्याने सर्वच्या सर्व दिंड्या मंदिरात प्रवेशासाठी घेतल्या जात असत, कालांतराने परिस्थितीत बदल होत जाऊन लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने जागेची मर्यादा लक्षात घेऊन या प्रक्रियेत गेल्या 15 वर्षांपासून बदल करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश करणाऱ्या 47 दिंड्या व्यतिरिक्‍त काही निर्बंध घालण्यात आले. तरी पोलीस प्रशासनास सर्व व दिंडी चालक मालक भाविकांनी सहकार्य करून हा विना आमंत्रित यांचा दैदिप्यमान धार्मिक सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा असेही आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here