ग्रेड सेपरेटरसाठी 15 कोटी 97 लाखांचा निधी मंजूर

खा. उदयनराजे भोसले; घाटाईदेवी रस्ता मजबुतीकरणासाठी साडेतीन कोटी रु.

सातारा – कास धरणाचे उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे कास- बामणोली रस्त्याच्या 26.20 ते 28 किलोमीटर या अंतरातील घाटाई देवी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरणाकरिता साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी आणि जनतेच्या हिताकरिता सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरची लांबी वाढवण्याबाबतच्या कामासाठी 15 कोटी 97 लाख रुपयांचा अतिरिक्‍त निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांसाठी सुमारे 19 कोटींच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उदयनराजे भोसले यांनी पुढे नमूद केले आहे की, कास धरण उंची वाढवण्याच्या कामामुळे पाण्याचा साठा सध्याच्या धरणालगत असणाऱ्या कास- बामणोली रस्त्यापर्यंत साठणार आहे. त्यामुळे बामणोलीकडे कास धरणाजवळील रस्त्याने जाणे अशक्‍य होणार आहे, त्यामुळेच या रस्त्याला पर्याय म्हणून कासच्या अलिकडे घाटाई देवी फाटयापासून घाटाई देवी मंदिरमार्गे पुढे कास धरणाच्या पलिकडे जाणाऱ्या सुमारे आठ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. याकरीता राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, या कामाकरीता सुमारे साडेतीन कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

सातारा शहरात ग्रेडसेपरेटरचे काम वेगाने सुरु आहे. या ग्रेडसेपरेटरची रयत शिक्षण संस्थेसमोरची लांबी विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वाढवणे तसेच जुन्या कोल्हापूर मार्गावरही ग्रेडसेपरेटरची लांबी या रस्त्यावरील असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरीता आणि नागरिकांच्या सोयीकरीता वाढवण्यात यावी, अशी सूचना मागणी शासनाकडे आम्ही केली होती. त्यानुसार या दोन्ही ठिकाणच्या ग्रेडसेपरेटरची लांबी वाढवण्याकरीता सुमारे 16 कोटी रुपयांच्या मूळ रकमेशिवाय जादा तरतूद करण्यात आली आहे. असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here