15 सप्टेंबरला 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार

शिक्षणमंत्र्यांची माहिती: महाराष्ट्र मिशन 1 मिलियन चे आयोजन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात येत्या 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळून महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे.

येत्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आयोजित केलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आज मुंबईत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तावडे सांगितले की, महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियन या कार्यक्रमाचे उद्घाटन 15 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे राज्यपाल सी.विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने देशात 1 कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे. मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तावडे यांनी “महाराष्ट्र मिशन -1 मिलियन” ची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत येत्या 15 सप्टेंबर 2017 रोजी राज्यभर 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. “महाराष्ट्र मिशन – 1 मिलियन” योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे 30 हजार शाळांमध्ये प्रत्येकी 3 याप्रमाणे 1 लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. प्रत्येक शाळेने किमान 50 विद्यार्थी जे फुटबॉल खेळणार आहेत त्यांची नावे, पत्ते व इ. माहिती क्रीडा विभागाला कळविणे सुरु केले आहे. यासाठी शाळा महाविद्यालयांतील मैदानांव्यतिरिक्‍त तीनशे मैदानांची आखणी केली आहे. अंदाजे 15 लाख विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

मुलांनी ई गॅझेटपासून दूर राहावे हाच उददेश
ई-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मुलांचे मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आजची मुले विविध खेळाचे सामने मैदानावर कमी तर मोबाईल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांनी ई-गेझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिक्षण विभागाने 15 सप्टेंबर हा दिवस सूचनांशिवायचा दिवस सांगितले असल्यामुळे मोठया प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहतील असा विश्‍वासही तावडे यांनी व्यक्‍त केला आहे.

 

– मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, आदिवासी संघ, दिव्यांग विद्यार्थ्यांचा संघ असे फुटबॉलचे सामने येथे खेळले जाणार

– बुलढाणामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू असे एकाच कुटुंबातील सदस्य फुटबॉलचा सामना खेळणार आहेत.
– बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथील क्रीडा संकुलात टाटा कॅन्सर हॉस्पीटल मधील रूग्ण आणि विद्यार्थ्यांमध्येही फुटबॉल सामना रंगणार.

– ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमवेत आदिवासी पाड्यांवरदेखील फुटबॉलचा किक-ऑफ होणार.

– सिंधुदुर्गामध्ये विद्यार्थ्यांचा बीच फुटबॉल बरोबरच केंद्रीय कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यातील फुटबॉल सामना आकर्षण ठरणार.

– पुण्यामध्ये सव्वाशेहून अधिक फुटबॉल क्‍लब या उपक्रमात सहभागी होणार असून मध्यवर्ती कारागृहातील फुटबॉल सामना, पोलिसांचा फुटबॉल सामना, मुला-मुलींना शाळेत सोडण्यास येत असलेल्या रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आणि फ्री-स्टाईल फुटबॉल जगलिंग या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके हे आकर्षण ठरणार.

– फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत जगभरातील टॉप 25 मध्ये स्थान मिळविलेला राजेश राठी या युवकाची प्रात्यक्षिके हे शनिवारवाड्यासमोरील या महोत्सवात आकर्षण ठरणार.

– युवासेनेचे प्रमुख आणि फुटबॉल संघटनांचे पदाधिकारी आदित्य ठाकरे हे सुध्दा 15 सप्टेंबर रोजी मिशन फुटबॉलच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

– छत्रपती पुरस्कार विजेते तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेते राज्यात त्या त्या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलच्या सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)