श्रावण महिन्यात दर्शनासाठी मिडीबसची सेवा
मुंबई- कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांसाठी 20 मिडी बसेसची सेवा सुरु केली जाणार आहे. बॅटरी ऑपरेटेड असलेल्या या बसेस पर्यटन विभागाकडून खरेदी करण्यात आल्या असून श्रावणापूर्वी ही बस सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात भीमाशंकर देवस्थान परिसराच्या विकास कामाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी 148.37 कोटी रु चा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांन दिली. या आराखड्यातील कामे दर्जेदार पध्दतीने व आणि वेगाने पणे पूर्ण करण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या आराखड्यातील जी कामे पूर्णत्वाला आली आहेत ती श्रावणापूर्वी पूर्ण होतील असे पाहावे.
रुद्राक्षाची 100 झाडे
भीमाशंकर येथे उभारण्यात येत असलेल्या महादेव वन प्रकल्पांतर्गत विविध 12 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. येथे बेलाची 150, तर रुद्राक्षाची 100 झाडे लावली आहेत. आराखड्यातील 14 कामे प्रगतीपथावर आहेत.
आराखड्यात सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते विकास, मंदिर परिसर संवर्धन, भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा, पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना ,घन कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, महादेव वन, विश्रामगृह, अशा विविध कामांचा समावेश आहे.
भक्तांना जप आणि आराधना करण्यासाठी एक हॉल तयार केला जावा, यज्ञ करू इच्छिणाछया भाविकांसाठी एक यज्ञकुंड तयार केले जावेत, ओम नमः शिवाय चा जप करणारा नंदी उभारला जावा, दिव्यांगासाठी, जेष्ठ नागरिकांसाठी दर्शनाला जाण्याची व्यवस्था निर्माण केली जावी. रोजगार निर्मितीबरोबर नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंमलबजावणीत स्थानिकांना सहभागी करून घेण्याच्या सुचनाही यावेळी करण्यात आल्या.