निवडणूक जाहीर झाल्यापासून 143 कोटींची रोकड जप्त 

रोख रकमेबरोबरच मद्य, अंमली पदार्थ, सोन्यासह 540 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत देशभरात 143 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रोख रकमेबरोबरच मद्य, अंमली पदार्थ, सोन्यासह सुमारे 540 कोटी रूपयांचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत करण्यात आला आहे.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. ती बाब ध्यानात घेऊन काळा पैसा रोखण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध मार्गांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊले उचलली आहेत. त्याअंतर्गत देशभरात मोठ्या संख्येने निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय, फिरती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

त्यानंतर 25 मार्चपर्यंत जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद मुद्देमालाची माहिती आयोगाकडून मंगळवारी जारी करण्यात आली. त्यानुसार 89 कोटींचे मद्य, 131 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 162 कोटी रूपयांचे सोने आणि इतर मौल्यवान धातू तसेच 12 कोटींच्या वस्तूही हस्तगत करण्यात आल्या. राज्यांचा विचार करता तामीळनाडूत सर्वांधिक 107 कोटी रूपयांचा अवैध मुद्देमाल पकडण्यात आला. त्याखालोखाल उत्तरप्रदेशात 104 कोटी, आंध्र प्रदेशात 103 कोटी तर पंजाबमध्ये 92 कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटकात 26 कोटी, महाराष्ट्रात 19 कोटी तर तेलंगणात 8 कोटींच्या मुद्देमालाची जप्ती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)