१४ मे’ला लाँच होणार वनप्लस ७; जाणून घ्या फीचर्स

गेल्या काही वर्षांपासून जगभरातील स्मार्टफोन प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘वन प्लस’ या चायनीज स्मार्टफोन मेकिंग कंपनीची मे अथवा जून महिन्यामध्ये आपला स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये उतरविण्याची प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कंपनीकडून आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘मे’ महिन्यामध्ये लॉंच करण्यात येणार असून वनप्लस ७ची लॉंच डेट १४ मे ठरवण्यात आली आहे. त्यामुळेच आता जगभरातील स्मार्टफोनप्रेमी वनप्लसच्या नव्या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

जगभरामध्ये आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या स्मार्टफोन कंपन्यांच्या स्मार्टफोन्सप्रमाणेच फीचर्स मात्र त्यांच्या तुलनेत किंमत निम्म्याहुनही कमी ही वनप्लसची खासियत असल्याने “फ्लॅगशिप किलर’ हे बिरुद वनप्लसला देण्यात आले आहे. वनप्लसने गतवर्षी वनप्लस 6 व 6 टी हे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेमध्ये टप्प्याटप्प्याने उतरवले होते. मात्र या वर्षी कंपनीतर्फे पहिल्यांदाच वनप्लसचे दोन स्मार्टफोन्स लॉंच केले जाणार असून यांचे नामकरण वनप्लस 7 व 7 प्रो असं करण्यात आलं आहे.

दरम्यान, स्मार्टफोन प्रेमींची उत्कंठा अधिकाधिक वाढविण्यासाठी वनप्लसचे संस्थापक पेट लावू यांनी ट्‌विटरद्वारे कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉंच करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्‌विटद्वारे यावर्षीचा आपला स्मार्टफोन दिसायला अधिक “देखणा’ व वापरण्यासाठी अधिक “सॉफ्ट’ असणार असल्याचे सांगत यंदाच्या वनप्लसमध्ये जगातील सर्वाधिक गतिशील मानला जाणारा स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर वापरण्यात येणार असल्याची ‘हिंट’ दिल्याची चर्चा स्मार्टफोनप्रेमींमध्ये आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये वनप्लसद्वारा लॉंच करण्यात आलेल्या वनप्लस 6 टी या स्मार्टफोनमध्ये “वॉटरड्रॉप’ डिस्प्ले वापरण्यात आला होता त्यामुळे यावर्षीच्या वनप्लसमध्ये त्यामध्ये अपडेट करण्यात येईल अशी चर्चा आहे. सध्या स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये इलेव्हेटेड कॅमेऱ्याची चांगलीच क्रेझ असून इलेव्हेटेड कॅमेऱ्यामुळे स्मार्टफोनच्या समोरील बाजूस संपूर्ण डिस्प्ले देता येतो. यावर्षीच्या आपल्या स्मार्टफोनमध्ये वनप्लसद्वारे एलेव्हेटेड फ्रंट कॅमेऱ्याचा वापर केला जाण्याची शक्‍यता असून असे झाल्यास यावर्षीचा वनप्लस “नॉचलेस’ असणार आहे.

वनप्लसने वनप्लस 5 या स्मार्टफोनपासून आपल्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून यावर्षी वनप्लसद्वारे एक पाऊल पुढे जाऊन ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर यावर्षीच्या स्मार्टफोनमध्ये क्वाड एचडी डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5 जी, हे फीचर्स देखील देण्यात येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर स्मार्टफोनप्रेमींमध्ये रंगल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)