14 हजार मालमत्ता “आयटी’च्या रडारवर

नवी दिल्ली – प्रत्येकी 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या सुमारे 14 हजार मालमत्ता प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत, असे प्राप्तीकर विभागाच्यावतीने सांगण्यात आले. नोटबंदी दरम्यान 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे काळ्या पैशासंदर्भात झालेल्या परिणामांची माहिती प्राप्तीकर विभागाच्यावतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आली. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

पूर्वी कधीही प्राप्तीकर परतावे भरले नव्हते, अशा ज्या व्यक्तींनी नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रोख रकमा बॅंक खात्यांवर जमा केल्या. त्यांच्याबाबतच्या माहितीचे विश्‍लेषण करण्यासाठी 31 जानेवारी रोजी “ऑपरेशन क्‍लीन मनी’ सुरु करण्यात आले. यादरम्यान 15,496 कोटी रुपयांचे उत्पन्न अघोषित असल्याचे निष्पन्न झाले. तर 13,920 कोटी रुपयांची मालमत्ता सर्वेक्षणानंतर जप्त करण्यात आली.

“ऑपरेशन क्‍लीन मनी’च्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लोकांच्या रोख व्यवहारांची करपात्रतेशी सांगड घातली जाऊ शकली नाही, अशा 18 लाख संशयितांबाबत तपासणी केली गेली. त्यासाठी केवळ 4 आठवड्यांच्या कालावधीमध्ये “ऑनलाईन व्हेरिफिकेशन’ केले गेले. 9.72 लाख लोकांच्या 13.33 लाख खात्यांवर 2.89 लाख कोटींची अवास्तव रक्‍कम जमा झाल्याचे तपासणीत आढळून आले. या खातेदारांकडून या रकमेबाबतची स्पष्टिकरणे मागवण्यात आली. या अवास्तव रकमेचा स्रोत केवळ 3 ते 4 आठवड्यात शोधून काढला गेला, असे प्राप्तीकर विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र यापैकी किती जण प्रामाणिक होते आणि किती रक्कम प्रामाणिक खातेदारांची आणि किती बेहिशोबी होती, याचा उल्लेख मात्र या निवेदनात नाही. बेहिशोबी रकमेवरील किती कर जमा झाला याचाही उल्लेख यामध्ये नाही.

कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त, मध्यम आणि कमी जोखमीच्या व्यक्‍तींवर कारवाई झाली. याशिवाय 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या सुमारे 14 हजार मालमत्तांची मालकी असलेल्या आणि प्राप्तीकर न भरणारे शोधून काढले गेले. याबाबतचा तपास सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नोटबंदीनंतर छाप्यांची संख्या 447 वरून 1,152 वर पोहोचली. (158 टक्‍क्‍यांनी वाढ) तर जप्तीची कारवाई जवळपास दुप्पट म्हणजे 712 कोटी रुपयांवरून 1,469 कोटी रुपयांवर पोहोचली. बेहिशोबी मालमत्ता उघड होण्याचे प्रमाणही 11,496 कोटी रुपयांवरून 15,496 कोटी रुपयांवर (38 टक्‍क्‍यांनी वाढ) गेले. तर बेहिशोबी मालमत्ता उघड होण्याचे प्रमाण 9,654 कोटी रुपयांवरून 13,920 कोटींवर रु (44 टक्के वाढ) गेले. या सर्व कारवाईचा परिणाम म्हणून ऍडव्हान्स टॅक्‍समध्ये 41.79 टक्‍क्‍यांची वाढ झाली. तर स्वयं मूल्यांकन करून भरणाऱ्यांच्या करात 34.25 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

“ऑपरेशन क्‍लीन मनी’चा परिणाम
15,496 कोटी रुपयांचे उत्पन्न अघोषित निष्पन्न
13,920 कोटी रुपयांची मालमत्ता सर्वेक्षणानंतर जप्त
9.72 लाख लोकांच्या 13.33 लाख खात्यांवर 2.89 लाख कोटींच्या अवास्तव ठेवी

नोटबंदीनंतरची कारवाई
छापे 447 वरून 1,152 वर वाढले
जप्ती 712 कोटी रुपयांवरून 1,469 कोटी रुपयांइतकी वाढ
बेहिशोबी मालमत्ता मान्य करण्याचे प्रमाण 11,496 कोटी रु.वरून 15,496 कोटी रु.
बेहिशोबी मालमत्ता उघड होण्याचे प्रमाण 9,654 कोटी रुपयांवरून 13,920 कोटींवर रु

इन्कम टॅक्‍समधील ऍडव्हान्स टॅक्‍समध्ये 41.79 टक्‍क्‍यांची वाढ
स्वयं मूल्यांकन करून भरणाऱ्यांच्या करात 34.25 टक्‍क्‍यांची वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)