सय्यद सलाहुद्दीनच्या 13 मालमत्ता ईडीकडून जप्त 

दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याप्रकरणी कारवाई

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित दहशतवादी सय्यद सलाहुद्दीनशी संबंधित 13 मालमत्ता सक्‍त वसुली संचलानालयाने आज जप्त केल्या. जम्मू काश्‍मीरमधील या सर्व मालमत्तांचा संबंध दहशतवादाला अर्थसहाय्य करण्याशी जोडला जात होता. सय्यद सलाहुद्दीन हा बंदी घातलेली आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या आहे.

या मालमत्तांची जप्ती करण्यासाठी “ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाईसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या 13 मालमत्तांची एकूण किंमत 1.22 कोटी रुपये इतकी असून त्याची मालकी मोहम्मद शफी शाह या बंडिपोरामधील रहिवाशाकडे आणि जम्मू काश्‍मीरमधील अन्य सहा जणांकडे आहे. हे सर्वजण कथितरित्या दहशतवादी संघटनांसाठी काम करत आहेत. सलाहुद्दीन, शाह आणि अन्य व्यक्‍तींच्या विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन “ईडी’ने या प्रकरणी मनी लॉंडरिंगशी संबंधित गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण दाखल करून घेतले आहे.

हिज्बुल मुजाहिदीन ही जम्मू काश्‍मीरमध्ये सर्वात जास्त सक्रिय असलेली दहशतवादी संघटना आहे. या संघटनेकडून दहशतवाद्यांना अर्थसहाय्य आणि फुटिरवादी कारवाया केल्या जात असतात. पाकिस्तानमधील रावळपिंडीत बसून सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचे सहकारी या संघटनेवर नियंत्रण ठेवून असतात. “जम्मू काश्‍मीर अफेक्‍टीज रिलीफ ट्रस्ट’ या विश्‍वस्त संस्थेद्वारे मिळवलेल्या पैशातून दहशतवादी कारवाया केल्या जात असतात. या संस्थेला “आयएसआय’ आणि पाकिस्तानातील अन्य संघटनांचे पाठबळ आहे, असे “ईडी’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हवाला आणिमार्गांच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवादासाठीचे पैसे पाठवले जातात, असे तपासात निष्पन्नही झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)