अर्थिंगनंतर 12 हजार पथदिवे अखेर “सुरक्षित’

पुणे – शहरातील रस्त्यांवर नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने लावलेल्या 12 हजार पथदिव्यांना आर्थिंग देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे पथदिवे धोकादायक बनले होते. अखेर पालिका प्रशासनाने गेल्या महिन्याभरात या सर्व पथदिव्यांना आर्थिंग देण्याचे काम पूर्ण केले आहे.

ऑगस्ट महिन्यात वारजे येथील एका लहान मुलाचा पथदिव्याच्या खांबाला आर्थिंग नसल्याने वीजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विद्युत विभागाने कनिष्ठ अभियंत्यांच्या मदतीने तातडीने शहरातील सर्व पथदिव्यांचे सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यानुसार, गेल्या महिन्याभरात जवळपास 1 लाख पथदिव्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले. त्यात 20 हजार पथदिवे आर्थिंगविनाच सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या पथदिव्यांच्या खांबांमध्ये विद्युत प्रवाह संचारीत असून रस्त्याने जाणाऱ्या अथवा पदपथावर असलेल्या या खांबाला एखाद्या नागरिकांचा स्पर्श झाल्यास त्याला जीव गमवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर, अद्यापही जवळपास 35 हजारहून अधिक खांबांचे सर्वेक्षण बाकी असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या खांबांची स्थिती पाहाता आणखीन तेवढेच खांब आर्थिंगविना सापडण्याची दाट शक्‍यता आहे.

12 हजार खांबाची दुरुस्ती पूर्ण
गेल्या महिन्याभरात महापालिकेच्या विद्युत विभागाने आर्थिंग नसलेल्या 20 हजारपैकी 12 हजार खांबांची दुरुस्ती केल्याचा दावा विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने हाती घेतले असून ते पूर्ण केले जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन उर्वरीत खांबांचे सर्वेक्षण कमीत कमी वेळेत पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, हे काम ठेकेदारांच्या माध्यमातून केले जात असून पुढील महिन्याभरात ते पूर्ण केले जाणार असल्याचे कंदुल यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)