12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अध्यादेशास मंजूरी


किमान शिक्षेच्या कालावधीमध्ये 20 वर्षांपर्यंत वाढ


तपास आणि खटला 2 महिन्यात पूर्ण व्हायला हवा


अपीलावरील सुनावणी 6 महिन्यात पूर्ण व्हावी


आरोपीला अटकपूर्व जामीन नाही

नवी दिल्ली – 12 वर्षांखालील बालकांवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षेची तरतूद करण्यात यावी, यासाठीच्या अध्यादेशास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या अध्यादेशाद्वारे भारतीय दंड संहिता, पुरावा कायदा, गुन्हेगारी विरोधी कायदा आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. बाल लैंगिक अत्याचारांमध्ये दोषी आढळणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याच्या हेतूने या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.

जम्मू काश्‍मीरमध्ये कठुआ आणि गुजरातमध्ये सूरत इथे झालेल्या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणांच्या पार्श्‍वभुमीवर हा अध्यादेश काढण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कारामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी या मागणीने देशभर जोर धरलेला आहे. त्याचा विचार करून 12 वर्षांखालील बालकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या अध्यादेशाला मंजूरी दिल्यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी तो पाठवून देण्यात येणार आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद व्हावी यासाठी सरकार विचार करत असल्याचे केंद्राच्यावतीने कालच सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने व्हावा यासाठीही काही उपाय योजना करण्यात येणार आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आता किमान शिक्षा जन्मठेपेची असणार आहे. सध्या या गुन्ह्यासाठी 7 ते 10 वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र त्या तरतूदीस विरोध होत आहे.

जर बलात्कार झालेली पीडीत मुलगी 16 वर्षांखालील असेल तर गुन्हेगारास होणाऱ्या शिक्षेची मुदत सध्याच्या 10 वर्षांवरून वाढवून 20 वर्षे करण्यात आली आहे. ही शिक्षा आजन्म कारावासात वाढवली जाऊ शकते. याचाच अर्थ गुन्हेगारास नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत उर्वरित सर्व आयुष्य तुरुंगातच काढावे लागू शकते. जर पीडीत मुलगी 12 वर्षांखालील असेल तर गुन्हेगारास होणारी किमान शिक्षा 20 वर्षांची असू शकते. ही शिक्षा आजन्म कारावास किंवा फाशी अशी वाढवली जाऊ शकते.

बलात्काराशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आणि खटल्याचा कालावधीही निश्‍चित करण्यात आला आहे. हा तपास दोन महिन्यात पूर्ण व्हायलाच हवा. या प्रकरणातील निकालाला अपील दिले गेल्यास त्याची सुनावणीही सहा महिन्यात पूर्ण व्हायला हवी. याशिवाय 16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार किंवा सामुहिक बलात्कारातील आरोपीस अटकपूर्व जामीनाची तरतूद असणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)