115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: स्पार्टन इलेव्हन पुणे संघाची विजयी सलामी

पुणे: स्पार्टन इलेव्हन पुणे संघाने औरंगाबादच्या संघाचा एकतर्फी पराभव करताना येथे सुरु असलेल्या 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पधेर्ला पिंपरी-चिंचवड येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये शनिवारपासून सुरुवात झाली.

स्पर्धेतील पहिल्या लढतीत भगवान पवारने केलेल्या चार गोलच्या जोरावर स्पार्टन इलेव्हन पुणे संघाने औरंगाबाद संघावर 8-1 असा दणदणीत विजय मिळवला. लढतीच्या तिस-याच मिनिटाला भगवानने गोल केला. यानंतर त्याने 15व्या मिनिटाला दुसरा गोल करून पहिल्या सत्राअखेर पुणे संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भगवानने दुस-या सत्रात दोन (21 व 27 मि.), तर एस. अभिषेकने (25 मि.) एक गोल केला. यामुळे पुणे संघाकडे 5-0 अशी आघाडी झाली होती. तिस-या सत्राच्या सुरुवातीलाच अमर खराडेने (31 मि.) गोल करून पुणे संघाची आघाडी वाढवली. याच्या सहा मिनिटानंतर अभिषेकने (37 मि.) वैयक्तिक दुसरा गोल केला. यानंतर 50व्या मिनिटाला आर्यन शेंडगेने गोल करून पुणे संघाची आघाडी 8-0ने वाढवली. औरंगाबाद संघाकडून एकमेव गोल अविनाशने (57 मि.) केला. मात्र, त्याचा फारसा काही परिणाम निकालावर झाला नाही.

-Ads-

तर, दुसऱ्या लढतीत नदीम शेखच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर नागपूर संघाने रत्नागिरी संघावर 6-0ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. लढतीच्या आठव्याच मिनिटाला नदीमने गोल करून नागपूर संघाच्या खात्यात पहिला गोल जमा केला. यानंतर नदीमने 31व्या आणि 34व्या मिनिटाला गोल केले. नागपूरकडून फासिम शेख (12 मि.), जावेद (36 मि.) आणि समिद शेख (37 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून नदीमला चांगली साथ दिली.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक समीर मासुळकर, पिंपरी-चिंचवड क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष इक्रम खान तसेच रोमानियाची हॉकी खेळाडू लव्हिनिया , स्पर्धेचे संचालक शरद रोच, योगेश मुथेय्या, महेश रसाळ, पार्थ अयंग्गार यांच्या उपस्थितीत झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)