115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: औरंगाबाद संघाची जळगाववर सहज मात

पुणे: औरंगाबाद संघाने जळगावर संघावर 5-0 असा तर, हरियाणाने भोपाळचा 3-1 असा पराभव करताना महाराष्ट्र हॉकी संघटना आयोजित 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.
नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या लढतीत औरंगाबाद संघाच्या आक्रमक खेळासमोर जळगाव संघाचा निभावच लागला नाही.

पहिल्या सत्रातील पाचव्या मिनिटाला अमन शेखने मैदानी गोल करून औरंगाबाद संघाचे खाते उघडले. यानंतर काही वेळ जळगावच्या खेळाडूंनी औरंगाबादच्या खेळाडूंना रोखून धरण्यात यश मिळवले. नंतर लढतीच्या 17व्या मिनिटाला अबिद सय्यदने जळगावच्या गोलरक्षकाला चकवून अप्रतिम गोल केला आणि औरंगाबादची आघाडी 2-0ने वाढवली. लढतीच्या 27व्या मिनिटाला औरंगाबादच्या अमन शेखने जाहीद शेखच्या पासवर गोल केला. यानंतर नावेद शेख आणि अबिद सय्यदने दोन मिनिटांच्या आत प्रत्येकी एक गोल केला. लढतीच्या 30व्या मिनिटाला नावेद शेखने गोल केला, तर 32व्या मिनिटाला आकाश घुलेच्या पासवर अबिद सय्यदने गोल करून औरंगाबादची आघाडी 5-0ने वाढवली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून औरंगाबादने जळगाववर सहज मात केली. जळगावच्या खेळाडूंना शेवटपर्यंत औरंगाबादची बचाव फळी भेदता आली नाही.

यानंतर दुसऱ्या लढतीत हरियाणा संघाने भोपाळचे आव्हान 3-1 अशा गोलफरकाने परतवून लावले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर हरियाणाच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचल्या. मात्र, भोपाळने त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच हरियाणाला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, यावर भोपाळच्या खेळाडूंनी सुरेख बचाव केला. मध्यंतरापर्यंत गोलशून्यची कोंडी काही फुटली नव्हती. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक चाली रचल्या. तिसऱ्या सत्रात शुभमने 38व्या मिनिटाला हरियाणाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्करणी लावला. याच्या दोन मिनिटानंतर राजनने (40 मि.) गोल करून हरियाणाची आघाडी वाढवली. लढतीच्या 49व्या मिनिटाला टायगरने गोल करून भोपाळची गोल पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढच्याच मिनिटाला सोहनसिंगने (50 मि.) गोल करून हरियाणाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम राखून हरियाणाने आगेकूच केली.

फोटो ओळ – पुणे – महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित 115 व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत खुल्या गटात औरंगाबाद ( पांढरी जर्सी ) आणि जळगाव ( हिरवी जर्सी) यांच्या सामन्यातील एक क्षण.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)