डोंगरी विद्युत विकासाला 11.22 कोटी

संग्रहित छायाचित्र....

आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश

सणबूर – महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून राज्यातील डोंगरी तालुक्‍यांकरिता विद्युतची प्रलंबित कामे करण्याकरिता डोंगरी विकास आराखडा तयार करावा, असे धोरण ऊर्जामंत्री यांनी आखले होते. त्यानुसार पाटण मतदार संघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण या 100 टक्के डोंगरी तालुक्‍यातील विद्युत विकासाची प्रलंबित कामे करण्याकरिता महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यामार्फत तयार केलेल्या डोंगरी विद्युत विकास आराखड्यास आवश्‍यक 11 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी केली होती. याबाबत सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला आहे. ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी निधी मंजुरीचे लेखी आदेश महाऊर्जा विभागामार्फत पारित केले आहेत अशी माहिती आ. देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पाटण तालुक्‍यातील विद्युत विकासाची बरेच वर्षांपासून प्रलंबित असणारी विविध कामे करण्याकरिता राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधिक्षक अभियंतामार्फत पाटण डोंगरी विद्यूत विकास आराखडा तयार केला. या आराखड्यातील कामांकरिता एकूण 11 कोटी 22 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी ऊर्जामंत्री यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावा याकरिता सातत्याने त्यांच्याकडे व शासनाकडे पाठपुरावा केला. यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेतही ऊर्जामंत्र्यांचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता लक्षवेदी सूचना तसेच तारांकीत प्रश्नही मांडले. याबाबत निधी मंजूर करून देणार असल्याचे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी दिले होते.

डोंगरी विकास आराखड्यातंर्गत उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे गंजलेले पोल बदलणे, मागणी असणाऱ्या ठिकाणी नवीन उच्चदाबाचे रोहित्रे बसविणे, लुज गाळे ओढणे, गंजलेले कंडक्‍टर बदलणे, केबल बदलणे, लघुदाब वाहिनीला स्पेअरर्स बसविणे, ताण देणे, वितरण रोहित्राला पुनर्आर्थिंग करणे, वितरण रोहित्राची केबल बदलणे, गंजलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्‍स बदलणे,बंद पडलेले कप्यॉसिटर बदलणे, उपकेंद्रामधील 33 केव्ही, 22 केव्ही, 11 केव्ही बेकर्स बदलणे, आयसोलेटर बदलणे, करंट ट्रान्सफॉर्मर व भारित रोहित्र बॅटरी सेट,बॅटरी चार्जर बदलणे,विशेष वितरण रोहित्राला पुनर्आर्थिंग करणे, कंन्ट्रोल पॅनलची दुरुस्ती करणे इत्यादी कामांचा यामध्ये समावेश आहे.

पाटण तालुक्‍यामध्ये मोठया प्रमाणात पवनऊर्जा क्षेत्र असल्यामुळे डोंगरी विकास आराखड्यातंर्गत पाटण तालुक्‍यातील विद्युत विषयक कामे पूर्ण करण्याकरिता विशेष बाब म्हणून महाऊर्जाकडे जमा असलेल्या मूलभूत सुविधा निधीमधून 11 कोटी 22 लाख इतका निधी महावितरणला देण्यात येणार आहे. या निधी मधील कामे ही पुढील तीन वर्षांमध्ये पूर्ण करावयाची आहेत. सदरचे लेखी आदेश अधीक्षक अभियंता, महावितरण यांना पाठविण्यात आले असल्याचे आमदार देसाई यांनी सांगितले आहे. लवकरच महावितरण यांची बैठक घेवून या आराखडयातील गंजलेले पोल बदलणे, नवीन पोल बसविणे,नवीन रोहित्रे बसविणे,पाणी पुरवठा संस्थाना 16 तास वीज देणे ही प्राधान्याने करावयाच्या कामांना सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here