11 नोव्हेंबरला ऊस पट्ट्यात सर्व व्यवहार बंद, चक्काजाम आंदोलन करणार- राजू शेट्टी

ऊस दराचा प्रश्‍न चिघळत असून शेतकर्‍यांचा संयम संपण्याआधी सरकारने मार्ग काढावा; अन्यथा २०१३ चा उद्रेक होईल

सांगली: ऊस दराचा प्रश्‍न चिघळत असून शेतकर्‍यांचा संयम संपण्याआधी सरकारने मार्ग काढावा. अन्यथा २०१३ चा उद्रेक होईल. वेळप्रसंगी कायदा हातात घेवू, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी (दि. ११) रोजी ऊस पट्ट्यात सर्व व्यवहार बंद, चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत जाहीर केले. सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आंदोलन होईल. शेतकर्‍यांना ऊस दर मिळू नये, यासाठी सर्वपक्षीय कारखानदार एकत्र आले आहेत. सरकारला रक्तपातच हवा असल्याचे दिसते. मात्र ऊसदरासाठी कोणालाही अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खा. शेट्टी म्हणाले, गत महिन्यात जयसिंगपुरातील ऊस परिषदेत दहा प्रमुख ठरावातील दोन प्रमुख ठराव महत्वाचे होते. त्यात एफआरपी अधिक २०० असा पहिला ठराव आणि दुसरा ठराव उचली संदर्भात होता. केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी आधी द्यावी. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिली नाही त्याचा गाळप परवाना रद्द करावा अशा सूचना असताना पोलिस संरक्षणात कारखाने सुरु झालेत. पोलिस बंदोबस्तात दरोडे टाकण्याचा उद्योग सुरु झाला आहे. सध्या दराच्या मागणीसाठी कोल्हापूरसह बहुतांश जिल्ह्यातील कारखाने सुरु आहेत. सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी कारखाने सुरू ठेवले आहेत. त्यांना आमची ताकद दाखवून देवू. अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता. तसा मला उसाचा दर दिसतोय. यामुळे मी गप्प बसणार नाही.

सरकारला रक्तपात हवाय…

ऊस दराच्या प्रश्‍नांवर सरकारने वार्‍यावर सोडले, कारखानदार दाद द्यायला तयार नाहीत. सरकारला रक्तपात हवा असून कारखानदार आणि शेतकरी यांची डोकी फोडायची आहेत. कुठलाही प्रश्‍न सामोपचाराने सोडवायचा नसल्याचे स्पष्ट दिसून येते. ऊस उत्पादकांना कुणीही दाद देणार नसल्याने कायदा हातात घ्यावा लागेल, पहिल्या टप्प्यात रविवार (दि. ११) रोजी सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जाईल. ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी ऊसाचे चिपाड कारखान्यांना जाणार नाही, याबाबतची दक्षता घेवून दरासाठी उभारण्यात येणार्‍या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही खा. शेट्टींनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला चंद्रकांतदादांचा छेद…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूच्या एका ऊस परिषदेत जी भूमिका घेतली त्याला आम्ही समर्थन केले, पण या मागणीला महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी छेद दिला. मग सरकारची वेगळी भूमिका आहे काय हे स्पष्ट करावे. जर असेच कारखाने सुरु राहिले तर आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्या असे समजायचे का?, राज्य सरकारला एफआरपीचे ३ तुकडे करायचे आहेत.

सरकार मधील काही नेत्यांना ही शेतकरी चळवळ मोडीत काढायची आहे. तसेच ऊस कारखानदारांशी तुम्ही जुळते घेतले आहे, या प्रश्‍नांवर बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांना बुडवण्यासाठी सर्व पक्षीय कारखानदार एकत्र आहेत. राजकारणाच्या वेळी पाहू सध्यातरी दरासाठी कोणालाही अंगावर घेवून संघर्षाची आमची तयारी आहे. एफआरपी दिली नाही, तर न्याय मागायचा कोणाकडे. आता आंदोलनाबाबत तडजोड नाही. आम्ही शेतकर्‍यांसाठी लढतच राहणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केवळ सरकार चर्चेस तयार असल्याचे वक्तव्य करीत आहेत, मात्र ऊस दरासाठी कुणालाही बोलवत नसल्याचे स्पष्ट झाले.

बोलणार नसल्यास एफआरपी अधिक २०० मान्य समजू…

ऊस दराबाबत कारखानदार बोलायला तयार नाहीत, कोणतीही भूमिका न मांडता गाळप सुरु केले. कारखानदार कामगार, शेतकरी यांच्यावर दबाव आणून ऊसाचे गाळप करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एफआरपी अधिक २०० रुपयांची रास्त मागणी केली आहे. जर कुणीही भूमिका मांडायला पुढे येणार नसेल, तर स्वाभिमानीने मागितलेले एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांना मान्य असल्याचे समजून घेवू, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले. ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसात बील मिळाले पाहिजे, अन्यथा कारखान्याचे अध्यक्ष, संचालक आणि कार्यकारी संचालकांना न्यायालयात खेचण्यात येईल, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सयाजीराव मोरे, महावीर पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)