पुणे: 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा

बालभारतीच्या पुस्तक खरेदीस मान्यता
पुणे महापालिका संचलित माध्यमिक शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन पुणे यांच्याकडून निविदा न मागविताही खरेदी या शैक्षणिक वर्षासाठी केली जाणार आहे. यात महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शाळांच्या पुस्तकांचा समावेश आहे. सुमारे 87 हजार पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 56 लाख 53 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

4 कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता

पुणे – हद्दीत समाविष्ट 11 गावांच्या सांडपाणी व्यवस्थेसाठी महापालिकेकडून स्वतंत्र प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सागार प्रायमुव्ह इनस्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कन्सलटन्ट यांच्याकडून केले जाणार आहे. यासाठी 3 कोटी 98 लाख 75 हजार (2 कोटी 98 लाख रुपये अधिक 98 लाख 75 हजार रुपये) या वाढीव रकमेपर्यंत काम करण्यासाठी व या कंपनीशी करारनाम्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कामासाठी तीन सल्लागारांच्या निविदा प्राप्त आल्या होत्या. प्रायमुव्ह कंपनीची निविदा सर्वात कमी दराची ठरल्याने त्यांच्या रुपये 2.98 कोटी रकमेच्या निविदेचा ठराव स्थायी समितीने 20 डिसेंबर 2016 रोजी मान्य केला होता. हे काम सुरू असून ते 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. यातून मनपा हद्दीत मैलापाणी वहन व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार करणे व अनुषंगिक कामे करण्यात येत आहेत. विविध व्यासाच्या मलनिस्सारण वाहिन्यांचे सर्वेक्षण, माहिती संकलन करुन पुढील 30 वर्षांच्या संभाव्य लोकसंख्येनुसार निर्माण होणारे मैलापाणी गृहीत धरुन तीन टप्प्यांमध्ये त्याची विभागणी करण्यात येणार आहे. या मैलापाण्यानुसार अस्तित्वातील मलवाहिन्यांची क्षमता तपासणे व आवश्‍यक व्यासाच्या मलवाहिन्या सुचविण्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच मैलापाणी शुध्दीकरणासाठी पंपिंग स्टेशन व एसटीपी बांधणे या कामांचे नियोजन करण्यात येणार आहेत.

यामध्ये पुणे शहरास मैलापाणी शुद्धीकरणनिहाय 15 विभागांमध्ये काम करण्यात येणार आहे. यातच आता 11 गावांचाही समावेश केला जाणार आहे. या गावांच्या समावेशामुळे मनपा क्षेत्रामध्ये 80.81 चौरस किमीने वाढ होत आहे. त्यामुळे मलनिःसारण व्यवस्थेमध्ये व मैलापाणी विभागात वाढ होणार आहे. त्यामुळे नव्याने आराखडा करताना आता 324.67 चौरस किमी इतक्‍या क्षेत्रासाठी नियोजन करणे आवश्‍यक आहे. जी वाढ सुमारे 33 टक्के इतकी आहे. समाविष्ट गावांचा मलनिस्सारण आराखडा करताना केशवनगर उर्वरित, साडेसतरानळी, उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, लोहगाव, शिवणे, उत्तमनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांमध्ये 80.81 चौरस किलोमीटर क्षेत्रावर काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 98 लाख 75 हजार रुपये इतका वाढीव खर्च होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)