11 गावांचा प्रभाग ठरणार सर्वात मोठा

निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर : शहराच्या चारही दिशांना हद्द

पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी निश्‍चित केलेला नवीन प्रभाग महापालिकेतील सर्वांत मोठा प्रभाग ठरणार आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर 25 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही निवडणूक घेणं अपरिहार्य असल्याने ही रचना केली आहे. दरम्यान, या नवीन प्रभागाची रचना जाहीर झाली असून त्यावर नागरिकांना 12 ऑक्‍टोबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत. त्यानंतर त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर होणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेचा हा 42 वा प्रभाग असणार असून त्याची लोकसंख्याही सर्वाधिक 2 लाख 39 हजार असून यामुळे नगरसेवकांची संख्या 164 वर जाणार आहे.

मागील वर्षी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर केला आहे. त्यानुसार, ही गावे शहराच्या चारही दिशांना असल्याने महापालिकेकडून त्यांचा संयुक्त प्रभाग करण्यात आला असून त्याला फुरसुंगी-लोहगाव असे नाव देण्यात आले आहे. शहरात सर्वत्र हा प्रभाग विखूरलेला असला तरी, प्रत्यक्षात त्याची सलगता नसल्याने प्रशासनाकडून या गावांच्या हद्दीनुसार, तो जाहीर केला असून त्यात उत्तरेला लोहगाव (उर्वरित) पूर्वेला मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री तर दक्षिण दिशेला आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी आणि पश्‍चिम दिशेला शिवणे (उत्तमनगर) ही गावे असणार आहेत. या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनेसाठी पालिका प्रशासनाकडून 12 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर, हरकती आणि सूचनांवर 17 ऑक्‍टोबरपर्यंत सुनावणी होणार असून 20 ऑक्‍टोबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

प्रचारासाठी दमछाक
शहराच्या चारही दिशांना पसरलेल्या या प्रभागामुळे प्रशासकीय अडचणी बरोबरच उमेदवारांचीही प्रचारासाठी चांगलीच दमछाक होणार आहे. शहराच्या चारही दिशांना हे प्रभाग असल्याने कोणत्याही भागात जायचे झाल्यास उमेदवारांना 25 किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. तसेच नगरसेवकच व्हायचे असल्यास आपल्याच भागात राजकीय नेते काम करतात, त्यामुळे उमेदवारांचा संपर्कालाही मर्यादा आहेत. त्यामुळे या निवडणुका या उमेदवारांपेक्षा पक्षाच्या चिन्हावरच महत्त्वाच्या ठरणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)