100 टक्के कर्जपरतफेडीची मल्ल्याची पुन्हा हमी

लंडन – बुडीत कर्जप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने सोमवारी जेट एअरवेजच्या आर्थिक समस्येबाबत सोशल मिडीयावरून दुःख व्यक्‍त केले आहे. तसेच आपल्या मालकीच्या किंगफिशर विमान कंपनीवरील सरकारी बॅंकांकडील सर्व 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची तयारी असल्याचेही त्याने पुन्हा एकदा म्हटले आहे. विजय मल्ल्याला इंग्लंडकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या आदेशांविरोधात न्यायालयातील त्याने अपील केले आहे. तब्बल 9 हजार कोटी रुपयांची आर्थिक अफरातफर आणि मनी लॉंडरिंगच्या आरोपांवरील खटल्यासाठी त्याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक अडचणींमुळे विमान सेवा थांबवावी लागलेल्या जेट एअरवेज आणि किंगफिशर या आपल्या विमान कंपनीच्या आर्थिक आपत्तीमध्ये साधर्म्य असल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. “किंगफिशरसह काही विमानकंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. जे किंगफिशरबाबत घडले, ते घडण्याची कल्पनाही नसताना जेट एअरवेजबाबत घडले आहे.’ असे मल्ल्याने ट्विटरवर म्हटले आहे. मात्र हे प्रामाणिकपणे केलेल्या व्यवसायाचे अपयश आहे. मात्र आपण 100 टक्के कर्जपरतफेडीची हमी देऊनही आपल्यावर सीबीआय आणि ईडीकडून गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. केवळ माझ्यावरच असे आरोप का ? असा प्रश्‍न मल्ल्याने विचारला.

जेट कर्मचाऱ्यांचे थकित पगार आणि बेरोजगारीच्या मुद्दयावर टिव्हीवरील चर्चा बघून आपण व्यथित झालो आहे. किंगफिशर विमान कंपनीवरील सर्व कर्ज परतफेडीची माझी तयारी आहे, पण बॅंका ही परतफेड का घेत नाहीत? असेही त्याने म्हटले आहे. मल्ल्याने यापूर्वीही सोशल मिडीयावरून अशाच प्रकारे पोस्ट टाकून विमान कंपनीवरील सर्व कर्जपरतफेड करण्याची तयारी दर्शवली होती. स्कॉटलंड यार्डने एप्रिल 217 मध्ये मल्ल्याच्या प्रत्यार्परणासाठीच्या काढलेल्या वॉरंटवर मल्ल्याने जामीन मिळवला आहे. या संदर्भात मल्ल्याने केलेल्या अपीलावर इंग्लंडमधील उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)