नवी दिल्ली – देशभरातील वक्फ जमीनींचे जिओ टॅगिंग केले जाणार असून या जमीनींवर शिक्षण संस्था किंवा रूग्णालय उभारणीला सरकारकडून शंभर टक्के अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. केंद्रीय वक्फ मंडळाच्या 80 व्या वार्षिक बैठकीत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की देशभरात एकूण 5 लाख 77 हजार वक्फ मालमत्ता नोंदणी झालेल्या आहेत. त्यांना जिओ टॅगिंग केले जाणार असून त्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाणार आहे.
या जमीनींचा शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक कामांसाठी वापर व्हावा यासाठी सरकारने शंभर टक्के अनुदानाची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या मागास समाजील मुलींना या सोयी सुविधा पुरवण्यासाठीही या जमीनींचा वापर केला जाणार आहे.
ते म्हणाले प्रधान मंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत या जमीनीवर शाळा,महाविद्यालये, आयटीआय, पॉलिटेक्निक, रूग्णालये, बहुउद्देशीय हॉल, सदभावना मंडप अशी उभारणी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे शंभर टक्के अनुदान देण्याची मान्यता पंतप्रधान मोदींनी दिली आहे. या आधीच्या सरकारने अल्पसंख्य समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी देशातील केवळ 90 जिल्ह्यांची नोंद केली होती पण आमच्या सरकारने आता देशातील 308 जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे असेही नक्वी यांनी यावेळी सांगितले.