100 बांधकाम व्यवसायिकांच्या संपत्तीत 27 टक्के वाढ 

संग्रहित छायाचित्र
मुंबई: देशातील बांधकाम उद्योग जरी अडचणीत असला तरी गेल्या वर्षभरात देशभरातील 100 प्रमुख बांधकाम व्यवसायिकांच्या संपत्तीत 27 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बांधकाम व्यवसायिकांची संपत्ती तब्बल 2.37 लाख कोटी रुपयांपर्यंत (32.7 अब्ज डॉलर) गेली आहे. या 100 बांधकाम व्यवसायिकांमध्ये लोढा समुहाचे संस्थापक मंगल प्रभात लोढा यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. देशातील सर्वात मोठा बांधकाम उद्योग समूह असलेल्या “डीएलएफ’ आणि त्याचे संस्थापक के.पी.सिंह हे 2017 चे रिअल इस्टेट क्षेत्रातील देशातील सर्वात श्रीमंत होते. मात्र यावर्षी त्यांना पहिल्या 10 मध्येही क्रमांक राखता आलेला नाही. गेल्यावर्षी याच यादीमध्ये लोढा दुसऱ्या क्रमांकावर होते. “हुरून ग्रोह इंडिया रिच लीस्ट-2018′ नावाने ही यादी प्रसिद्ध आहे.
यावर्षी देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत ठरलेल्या मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 27,150 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बेंगळूरुस्थित एम्बसी समूहाचे जितेंद्र वीरवानी यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती 23,160 कोटी रुपये इतकी आहे. कुशल पाल सिंह यांचे चिरंजीव राजीव सिंह हे 17,690 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
चौथ्या क्रमांकावर चंद्रू रहेजा (14,420 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर विकास ओबेरॉय (10,980 कोटी) यांचा क्रम लागतो आहे. त्यानंतर निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी या बंधूंचा (7,880 कोटी) सहावा क्रमांक लागतो. सातव्या क्रमांकावर अजय पिरामल आणि कुटुंब (6,380 कोटी), बेंगळूरुतील मनोज आणि राज मेंडा बंधू (5,900 कोटी) हे नवव्या क्रमांकावर आहेत.
या यादीमध्ये “आरएमझेड’ समुहाचे कुणाल मेंडा हे सर्वात कमी 24 वर्षांचे आहेत. तर ईस्ट इंडिया हॉटेलचे पृथ्वीराज सिंह ओबेरॉय हे सर्वात ज्येष्ठ 89 वर्षांचे आहेत. 100 जणांपैकी केवळ चौघेजण 40 वर्षांच्या आतील आहेत. या यादीमध्ये 9 महिलाही आहेत.
“हरुन ग्रोह’ यादीमध्ये भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या रिअल इस्टेट व्यवसायिकांचा अंतर्भाव होतो. तर सप्टेंबर 2018 अखेरीस असलेल्या वैयक्तिक संपत्तीचा त्यासाठी विचार केला गेला आहे. या 100 जणांच्या यादीमधील 59 जणांची पहिलीच पिढी बांधकाम उद्योगक्षेत्रात उतरली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
यापैकी 35 बांधकाम व्यसायिक मुंबईतील रहिवासी आहेत. तर दिल्लीतील 22 आणि बेंगळूरुतील 21 व्यवसायिकांचा या यादीमध्ये समावेश आहे. देशभरातील 100 श्रीमंत बांधकाम व्यवसायिकांच्या या यादीमध्ये पुण्यातील 5 जणांचा समावेश आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)