100 टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही

भारत पाटणकर यांनी ठणकावले : कोयनानगरमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ

कोयनानगर, दि. 12 (प्रतिनिधी) – समन्यायी व सर्वांचा विकास या मुद्यावर मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यासोबत झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत जे निर्देश दिले गेले होते, त्याची अंमलबजावणी 8 महिने झाले तरी झाली नाही. आटपाडी पथदर्शी प्रकल्प मानून हा पॅटर्न राज्यभर राबवावा, यासह इतर मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथे धरणग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. दरम्यान, 100 टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे भारत पाटणकर यांनी ठाणकावून सांगितले.
कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोयना धरणग्रस्तानी शेंडी तुटो अथवा पारंबी हा निर्धार व्यक्त करून कोयना धरणग्रस्तांच्या शासनाने मान्य केलेल्या मागण्याची तातडीने अंमलबजावणी करून प्रत्यक्ष जमीन वाटपाची कार्यवाही सुरू करावी. या मागण्यांबरोबर समन्यायी विकास धोरणाचा पुरस्कार करावा या प्रमुख मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कोयनाधरणग्रस्ताना मार्गदर्शन करताना श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात आंदोलन केल्यानंतर आटपाडी, तासगाव, सांगोला तालुक्‍याला समन्यायी पथदर्श प्रकल्प मंजूर झाला. पाईपलाईनद्वारे सार्वत्रिक पाणी वितरणाचा आराखडा अंमलात आणला असला तरी या कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे. हा प्रकल्प राज्यभर राबवून या प्रकल्पासाठी त्याग करणाऱ्या लोकांना सिंचन सुविधा मिळाव्यात.
कोयना प्रकल्पग्रस्ताचे तसेच व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अजून संकलन रजिस्टर तयार झालेले नाही. गतवर्षी मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी कोयना धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्याची अंमलबजावणी केली नाही. 100 टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय, मान्य केलेल्या मागण्याची अंमलबजावणी सुरू केल्याशिवाय कोयना धरणग्रस्त उठणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
यावेळी बळीराम कदम महेश शेलार, सचिन कदम, संजय लाड, हरीषचंद्र दळवी, श्रीपत माने, डी. डी. कदम, धरणग्रस्त पुरुष व महिला उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)