स्वच्छतागृहांतच 1 टीएमसी पाण्याची नासाडी!

वापरले जाते पिण्याचेच पाणी : बोअरवेल योजना बारगळली

पुणे – शहरातील स्वच्छतागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेकडून 2015-16 मध्ये सर्व स्वच्छतागृहे बोअरवेलद्वारे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम बारगळले असल्याने शहरात स्वच्छतागृहांसाठी पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. शहरात जवळपास 20 हजार सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्यासाठी वर्षाला जवळपास 1 टीएमसी पाणी वापरले जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीतील पाणी उन्हाळ्यात तळ गाठत आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा पाण्याचा वाद नव्याने सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने 2015 पासून शहरातील पाणीकपातीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यात प्रामुख्याने एकाच परिसरातील स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र बोअरवेल घेऊन हे पाणी वापरण्यात येणार होते. त्यासाठी या वर्षात जवळपास 42 ठिकाणी बोअरवेल घेण्यात आले, तर 27 ठिकाणी स्वच्छतागृहांमध्ये त्याचा वापरही सुरू करण्यात आला. त्यानंतर आमदार निधी तसेच नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतूनही या कामासाठी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस झाल्याने तसेच धरणांत मुबलक पाणीसाठा तयार झाल्याने प्रशासनाकडून हा उपक्रम गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या संकल्पाचे वाभाडे पालिकाच काढत असल्याचे यातून समोर आले आहे.

नळ चोरीनेही पाणी जातेय गटारात
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात सुमारे 20 हजार सार्वजनिक तसेच कन्युनिटी टॉयलेट उभारलेली असून त्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात आहे. तर हे पाणी साठवण्यासाठी टाक्‍या नसल्याने तसेच स्वच्छतागृहात लावण्यात आलेले नळ तोडले अथवा चोरले जात असल्याने शहरातील बहुतांश स्वच्छतागृहात दिवसभरात लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)