22 पुनर्वसित गावठाणांमधील कामांचे प्रस्ताव सादर
पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांची पत्रकाद्वारे माहिती
सणबूर – राज्य शासनाकडे प्रलंबित राहिलेल्या कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 6 कामांना 1 कोटी 2 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. विधीमंडळाच्या सन 2018 च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्र्यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 13 कामांना 1 कोटी 39 लाख 58 हजार 420 रुपयांचा निधी यापूर्वी मंजूर केला आहे. उर्वरित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 6 कामांना नुकताच 1 कोटी 2 लाख 39 हजार 326 रुपयांचा निधी मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केला आहे.
यामध्ये मिरगाव चाफेर अंतर्गत रस्ते तयार करणे, नवजा (ढाणकल) अंतर्गत रस्ते तयार करणे, हुंबरळी (देशमुखवाडी) अंतर्गत रस्ते तयार करणे, बाजे वरसरकून येथे समाजमंदिर, पुनवली रिसवड येथे समाजमंदिर व मिरगाव चाफेर आर.सी.सी.गटर या कामांचा समावेश असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार आहे. सदरच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे विभाग क्रं.2 करवडी कराड यांना दिले असल्याचे आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकात म्हंटले आहे.
सन 2018 च्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 22 पुनर्वसित गावठाणांमधील कामे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहेत. या कामांसाठी 4 कोटी 62 लाख 82 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून महसूल विभागाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.