1 जानेवारी पासून पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्‍ती!

पोलीस आयुक्‍तांचा निर्णय : नागरिकांना राजी करणार

पुणे – पुण्यात नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती होणार आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्‌ यांनी घेतला आहे.

पुणे शहरात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी 300 नागरिकांचा मृत्यू होतो. यामध्ये डोक्‍यावर हेल्मेट नसल्याने मृत पावणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे.

याआधी पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू केल्यावर विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एकत्रित कृती समिती स्थापन करुन हेल्मेटसक्‍तीला विरोध केला होता. हेल्मेटसक्‍ती ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे हेल्मेटसाठी राजी करू, असे मत वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.

मुंबई व नागपूरसारख्या शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. मात्र, पुणे शहरात बंधन असूनही हेल्मेटसक्ती पाळली जात नाही. देशभरात सुमारे 35 हजार जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची धक्कादायक आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात सध्या जवळपास 27 लाख दुचाकी असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

अपघातांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. शहरात विविध ठिकारी मेट्रो, रस्ते व इतर बांधकामे सुरू आहेत. अनेकदा तरुण रस्त्यावर पडलेल्या बांधकाम साहित्यावरुन दुचाकी घसरुन अपघात घडले आहेत. तर, अनेकदा सिमेंट मिक्‍सर गाडीचा अंदाच न आल्याने तिला धडकून मृत्यू झाले आहेत. वाहन चालकांनी हेल्मेट वापरले असते, तर हे मृत्यू टाळता आले असते. हेल्मेट सक्तीमागे कोणताही स्वार्थ नसून नागरिकांनी किमान स्वत:च्या सुरक्षेसाठी तरी हेल्मेट घालावीे. हेल्मेट न घातलेल्या नागरिकावर एखाद्या चौकात कारवाई झाली, तर त्याच्यावर पुढच्या चौकातही कारवाई होऊ शकते. दंडाची पावती ही टोलच्या पावतीसारखी नसते, असेही उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या.

मागील काही महिन्यांपासून हेल्मेट सक्तीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हेल्मेटसक्तीचा संदेश पोहचवला जात आहे. 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती संदर्भात कारवाई सुरू होणार आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)