पुणे – “साहेब, तुम्ही दखल घेतली म्हणून माझ्या मुलाला 98 टक्के मार्क पडले’ अशा शब्दांत अवधूत खुंटवड यांच्या आईने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे जाहीरपणे आभार मानले.
पुणे शहरातील अत्यंत सुशिक्षित व शांत निसर्गरम्य परिसर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सहकारनगर परिसरात राहणाऱ्या स्वाती अशोक खुंटवड यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वी सहकारनगर, पुणे येथे घर घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अवधूत आय.सी.एस.सी.बोर्डाची इयत्ता 10 वीची परीक्षा देणार असल्याने त्या व त्याचे पती अशोक खुंटवड हे मुलाला अभ्यासास काय हवे नको ते पाहत होते; परंतु सोसायटीच्या बाजूला बाहेरील बाजूस महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात आले होते. मात्र, या बेंचवर रंगणाऱ्या चर्चांच्या आवाजामुळे अवधूतला अभ्यासाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे खुंटवळ कुटुंबीयांनी ही बेंच हटवावी, अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्याकडे केली होती. याची दखल घेत ही बेंच दत्तवाडी पोलिसांनी हटवून खुंटवळ कुटुंबाला मदत केली. त्यामुळे अवधूतला शांतपणे अभ्यास करता आला.
नुकत्याच जाहीर निकालात आय.सी.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत अवधूत 98 टक्के मार्क मिळवून पास झाला आहे. त्यानंतर “साहेब, तुम्ही दखल घेतली म्हणून माझ्या मुलाला 98 टक्के मार्क पडले’ अशा शब्दांत एका सुशिक्षित आणि दक्ष पालकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे जाहीरपणे आभार मानले व पेढे दिले. यावेळी अवधूतच्या मातोश्रीचे अश्रू अनावर झाले.
पोलीस निरीक्षकांचे मानले आभार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी केलेल्या मदतीचे खुंटवळ कुटुंबीयांन त्यांचे आभार मानले. तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझा मुलगा आय.सी.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळू शकला, असे सांगून त्यांना पेढे दिले.