पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात गुरुवारपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले.
येथील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी विद्यापीठाने पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने दोन दिवसांपूर्वी या लसीकरण केंद्राला मान्यता दिली.
“कोविशिल्ड’ लसीचे 100 डोस केंद्राकडे उपलब्ध झाल्यावर विद्यापीठाने प्रत्यक्ष लस देण्यास सुरुवात केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त विभागातील कर्मचारी प्रफुल्ल खेडकर यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. शशिकांत दुधगावकर म्हणाले, “आपल्याकडे आरोग्य केंद्रात लसीकरणासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा, आरोग्य कर्मचारी आहेत.
त्यामुळेच विद्यापीठात केंद्र सुरू करावे अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.’ डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, आपण दोन दिवसांपूर्वी लसीकरणासाठी नोंदणी सुरू केली असून सुरुवातीला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाच ही लस देणार आहोत. सरकारी नियमानुसार 45 वयावरील व्यक्तींनाच ही लस देण्यात येणार आहे. डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठातील दिव्यांग, परीक्षा विभाग कर्मचारी, सफाई कर्मचारी, वाहनचालक, सुरक्षा कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सेवकांना प्राधान्याने लस देत आहोत. लसीचा साठा ज्याप्रमाणे उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण केले जाईल.
मागील वर्षभरात कोविडच्या लढ्यात आण्विक निदान आणि संशोधन केंद्र, सिरो सर्व्हेक्षण, विद्यार्थी स्वयंसेवक, रक्तदान आदी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाचा कायमच सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिला आहे. इथून पुढेही लसीकरण केंद्राच्या माध्यमातून तो सुरू राहिल. विद्यापीठातील सर्वांनी या लसीकरण प्रक्रियेत सहभागी व्हावे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ