पुणे – शालार्थ प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे न नोंदविल्याने त्यांचे वेतन न निघाल्यास त्याला संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना जबाबदार भरण्यात येणार आहेत. शाळा कर्मचाऱ्यांची जुलैपासून वेतन देयके ही शालार्थ प्रणालीमधून ऑनलाइन पद्धतीनेच दिली जाणार आहेत. त्यामुळे शाळेमधील सर्वांची माहिती प्रणालीत भरण्याच्या सूचना वारंवार देण्यात आलेल्या आहेत. फेब्रुवारीचे वेतन ऑनलाइन व ऑफलाइननुसार तंतोतंत बरोबर असल्याची खात्री करून आता वेतन देयके अद्ययावर करुन घेणे आवश्यक आहे.
महापालिका व नगरपालिका, उच्च माध्यमिक शाळांमधील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत. या व्यवस्थापनांच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची जुलै महिन्याची वेतन देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाइन पद्धतीने सहाव्या वेतन आयोगानुसार तयार करण्यात येणार आहे.
सर्व व्यवस्थापनातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पूर्ण दक्षता घेऊन शालार्थ प्रणालीतील कार्यवाही पूर्ण करावी. सूचनांची दखल घेऊन त्वरीत आवश्यक ती कार्यवाही मुदतीत पूर्ण करुन घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक कविता शिंपी, अर्चना सरदार यांनी अशासकीय खासगी माध्यमिक शाळा, अद्यापक विद्यालये, सराव पाठशाळा, कनिष्ठ महाविद्यालय आदींना देण्यात आल्या आहेत.