शिक्रापूर- पुणे- नगर महामार्गावर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण तसेच रस्त्याच्याकडेला विविध वस्तू विक्री करणारे विक्रेते व वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी दिला.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके, शिकारपूरचे माजी सरपंच रामराव सासवडे, सणसवाडीचे माजी सरपंच सुरेश हरगुडे, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, बाबा चव्हाण, मंगेश विरोळे, अशोक दरेकर, राहुल टाकळकर, संजय भांबुर्डेकर, संजय नरके, महेश शिर्के, कैलास काळकुटे, सुनील चौरसिया, जितेंद्र जोशी, किरण पुंडे यांसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वाहतूक कोंडीविषयी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, रस्त्याच्या कडेला असलेले व्यावसायिक, अवजड वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले. यावेळी या बाबींवर लक्ष केंद्रित करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण तसेच रस्त्याच्या कडेला विविध वस्तू विक्री करणारे विक्रेते व वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पुणे- नगर रस्त्यावरील दुभाजकांवर रात्रीच्या वेळेस दुभाजकाच अंदाज येण्यासाठी रिक्लेक्टर बसविण्याचा तसेच कंपनीच्या वाहनांना तसेच एसटी चालकांना मुख्य चौकापासून पुढील अंतरावर थांबण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्रापूरचे माजी सरपंच रामराव सासवडे म्हणाले की, पुणे- नगर रस्त्यावर अनेक कंपन्या असून सर्व कंपन्यांचा सुटण्याची वेळ एकच असल्यामुळे कंपनीच्या अनेक बसेस एकाच वेळी रस्त्यावर येतात व त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते म्हणून परिसरातील विविध कंपन्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात यावा.
यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी आभार मानले.
- कारवाईपूर्वीच अतिक्रमण हटवा
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले की, शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरातील रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तसेच अतिक्रमणधारकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहे. भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रीसाठी बसू नये तसेच रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण देखील व्यावसायिकांनी काढून घ्यावे; अन्यथा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.