महाळुंगे इंगळे-उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीतील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वासुली (ता. खेड) गावच्या हद्दीतील जे. पी. एम. इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतून साडेआठ लाख रुपये किमतीचे महागडे दहा हजार ट्रान्सपोंचर सेन्सर पार्ट चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चाकण पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 13) अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश हनुमंत वाटेकर (वय 32, रा. काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाटेकर यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वासुली गावच्या हद्दीत जेपीएम या नावाची एक कंपनी आहे. रविवारी (दि. 12) मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून कंपनीतून एकूण 8 लाख 61 हजार रुपये किमतीचे दहा हजार ट्रान्सपोंचर सेन्सर पार्ट चोरून नेले. दुसऱ्या दिवशी चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने वाटेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.