– रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचे भाऊ कंपनीच्या संचालक मंडळावर
– कॉंग्रेसचा गंभीर आरोप,सीबीआय चौकशीची मागणी
मुुंबई – बोगस किटकनाशके तयार करून विदर्भात 40 शेतकऱ्यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतकऱ्यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीत भाजप नेत्याची भागीदारी असून, या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती हे उघडकीस आले आहे. तसेच देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात आहे, असे गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.
निवडणूक आयोगाने सक्त मनाई केलेली असतानाही पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यासंबधित छायाचित्र वापरून भाजपच्या प्रचार साहित्याची बेकायदा निर्मिती करण्याचे काम खार येथील युनायटेड फॉस्फरस लिटिडेट कंपनीमध्ये सुरु होते. कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने तेथे काल छापा मारून हे प्रचार साहित्य जप्त केले होते. भाजपने आज या प्रचार साहित्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा करून हात झटकले होते. मात्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या कंपनीशी भाजपाचा केवळ संबंधच नाही, तर त्यात भाजप नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याचा दावा केला.
या कंपनीच्या संचालक मंडळावर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे भाऊ प्रदीप गोयल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यवतमाळ येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूलाही हीच कंपनी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. गतवर्षी विदर्भात कापसावर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता व शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. अनेकांना कायमचे अपंगत्व आले तर काही जणांची दृष्टी गेली होती. ही किटकनाशके युनायटेड फॉस्फरस लिमीटेड या कंपनीने बनवली होती. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीकरिता विशेष तपास पथकाची स्थापना केली. परंतु चौकशी अहवालात आश्चर्यकारक पद्धतीने कंपनीला “क्लीन चीट’ देऊन त्यांनीच बनवलेल्या किटकनाशकाच्या मिश्रणाला दोषी ठरवले आणि मिश्रणावर बंदी घालण्यात आली.
सरकारच्या दबावामुळेच कंपनीला “क्लीीन चीट’ देण्यात आली. अद्याप या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही याचे कारण सरकारचे या कंपनीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या कंपनीचा बचाव सरकारकडून सुरु असल्याचा आरोप सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाच्या पथकाने या कंपनीच्या कार्यालयाला मंगळवारी सील केले आहे. या संपूर्ण प्रकारात काळ्या पैशाचा वापर होत असून राज्य व केंद्र सरकारकडून यंत्रणांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला सविस्तर पत्र लिहणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
मुंबईच्या कचरा घोटाळ्यातही हीच कंपनी !
युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीला मुंबई महानगरपालिकेने देवनार कचरा डेपोच्या व्यवस्थापनाचे साडेचार हजार कोटींचे कंत्राट दिले आहे. या कामात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भागीदार आहेत. भाजप नेत्याचे या कंपनीशी वैयक्तीक जवळीकीबरोबरच व्यावसायिक संबंध आहेत हे यातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे या कंपनीची देयके थांबवली होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या आरोपानुसार ही देयके देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे मध्यस्थी केली होती. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप केला होते असेही समजते. कचरा डेपोतील भ्रष्टाचाराचा पैसा व मध्यस्थी केल्याचा मोबदला भाजपच्या अनैतिक प्रचारासाठी वापरला जात आहे हे यातून स्पष्ट झाले असल्याचा आरोप सावंत यांनी केला.