लोहियांच्या भाकिताचा घेतला आधार
गोरखपूर -उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दिग्गज समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी केलेल्या भाकिताचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 वर्षे देशाचे नेतृत्व करतील, असे म्हटले.
योगींनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लोहियांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी संसदेत केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. आपला देश खेड्यांमध्ये राहतो. तेथील प्रत्येक गरिबाच्या घरात शौचालय उपलब्ध झाले आणि प्रत्येक गरिबाच्या इंधन गरजा भागल्या; तर त्यावेळी असणारा पंतप्रधान 25 वर्षे देशावर राज्य करेल, असे लोहिया त्यावेळी म्हणाले होते. त्यांचे स्वप्न आता मोदींनी पूर्ण केले आहे, अशी स्तुतिसुमने योगींनी उधळली.
देशातील सामान्य माणसाला आज मोदींबद्दल प्रचंड आदर वाटतो. जनतेचा ओढा त्यांच्याकडे आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मागील निवडणुकीत भाजपने उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाच्या जागांमध्ये तीनने भर पडेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.