एका दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
बारामती- वैद्यकीय क्षेत्राने शस्त्रक्रिया कुशलतेमध्ये घेतलेली झेप किती मोठी आहे, याची प्रचिती आज बारामतीत पुन्हा एकदा आली. जन्मानंतर अवघ्या एका दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान देण्यात डॉक्टर यशस्वी ठरले. शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातील या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माया दोरगे यांची प्रसुती झाली. परंतु, मुलाला हिरव्या उलट्या होत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील डॉक्टरांनी बाळाला बारामती येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.जन्मत: आपल्या बाळाचे शरीर योग्य काम करीत नसल्याचे समजल्याने दोरगे माता-पिता मोठ्या चिंतेत पडले. अशाही स्थितीत त्यांनी बाळाला घेवून बारामती गाठली.
येथील डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये या बाळाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बाळाच्या छोट्या आतड्याची पुरेशी वाढ नसल्याचे डॉ. मुथा यांना निदर्शनास आले, यावर तातडीने शस्त्रक्रीया करण्यात आली नाही तर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असाही निष्कर्ष समोर आला. यामुळे सर्जन डॉ. नितीन पळसे, भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार, डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा या वैद्यकीय पथकाने अवघ्या चार ते पाच तासाच्या बाळाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. एक दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रीया करणे धोकादायक असतानाही त्याचे माता-पित्यांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि डॉक्टरांनीही याच पाठबळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता, नवजात बाळ सुखरूप असून आज पंधरवड्यानंतर हे बाळ इतर मुलांसारखे नियमित जीवन जगत आहे.