लखनौ – भाजप सोडून नुकतेच कॉंग्रेसवासी झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा याही आता राजकारणात उतरल्या असून त्यांनी समाजवादी पक्षाचा हात धरला आहे. आज त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्या डिम्पल यादव यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश केला. त्यांना लखनौ मतदार संघातून गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या विरोधात पक्षातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आपण लखनौ मधून समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहात काय असा प्रश्न पत्रकारांनी आज त्यांना विचारला असता त्या म्हणाल्या की याचा निर्णय मी तुम्हाला उद्या देईन. कॉंग्रेसने या मतदार संघातून अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्या पक्षाचा पूनम सिन्हा यांनाच पाठिंबा राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लखनौ मध्ये राजनाथसिंह आणि पुनम सिन्हा यांच्यात सरळ लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे.