शाळेतील कडक शिस्तीचा बदला घेतला “स्प्रे पेटींग’ने
पुणे – शाळेतील कडक शिस्तीमुळे शालेय जीवनाचा आनंद घेता न आल्याचा राग माजी विद्यार्थ्याने शाळेवर काढला. शाळेच्या सर्व भिंतींवर बदनामीकारक मजकूर “स्प्रे पेटींग’ने लिहून तसेच शाळेचा प्रोजेक्टर चोरून याचा बदला घेतला. पकडले जाऊ नये म्हणून तोडाला मास्क लावून त्याने हे कृत्य मित्रासोबत केले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या प्रतिमेतील केवळ शूजवरून कोंढवा पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला साथीदारासह जेरबंद केले. त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे.
अर्श खान (18) आणि अली शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. ही घटना कोंढवा येथील एका हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालयात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या शाळेला नुकतेच एक नॉमिनेशम मिळाले होते. त्यानिमित्त शाळेमध्ये 23 एप्रिलला एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही बदला घेण्याची चांगली संधी साधत आरोपींनी आदल्या रात्री शाळेच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दोघांनीही तोंडाला मास्क लावले होते. त्यांनी “स्प्रे पेंटींग’च्या मदतीने शाळेच्या भींतींवर शिक्षकांबद्दल बदनामिकार मजकूर लिहीला. यानंतर जाताना प्रोजेक्टरही चोरून नेला. यामुळे शालेय प्रशासनाला मोठा धक्का बसला होता. त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांना तपासात हे कृत्य एखाद्या माजी विद्यार्थ्यांने केले असावे, असा संशय आला. यामुळे त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन तरुण तोंडाला मास्क लावलेले दिसले.
यातील एकाने पांढऱ्या कलरचा मोठ्या सोलचा शुज घातला होता. एवढा एकच धागा पोलिसांच्या हातात होता. त्यानुसार पोलीस काका पांडूळे यांनी शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्यामध्ये हे कृत्य करणारा अर्श खान असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.
शिक्षकांप्रती असलेला राग काढला अशापद्धतीने
यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले, अर्श खानने संबंधित शाळेत 11 वी आणि 12 वी केली. शाळेत अतिशय शिस्तबद्ध वातावरण आहे. येथे मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे. एखाद्या जवळ सापडल्यास तो जप्त केला जातो. तसेच, चित्रविचित्र हेअर स्टाईल करण्यासही मनाई आहे. यातच अर्श हा अभ्यासात हुशार नसल्याने शिक्षकांनी अनेकदा ही बाब त्याच्या पालकांच्या कानावर घातली होती. या सर्वांचा राग अर्शच्या मनात होता. त्याने संबंधित शाळेतून 12 वी झाल्यावर पुणे शहरातील एका महाविद्यालयात इंजिनिअरींगसाठी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, त्याला शाळेमध्ये एक कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली. ही संधी साधत त्याने त्याचा शाळेतील जीवलग मित्राला सोबत घेतले. यानंतर ऑनलाइन पद्धतीने कुलूप कापण्याचे कटर त्याने मागवले. या कटरच्या सहाय्याने शाळेत प्रवेश करून वरील कृत्य केले.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे व पोलीस कर्मचारी पांडुळे, कोळगे, शेलार, कुंभार, धिवार यांच्या पथकाने केली.