तांत्रिक कारणांमुळे जानेवारी-2018 पासून बंद होती यंत्रणा
पुणे – शालार्थ प्रणालीत खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील नवीन कर्मचारी, नवीन शाळा, नवीन पद समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी गठीत केलेले विशेष कृती दल संपुष्टात आणण्यात आले आले आहे. शासनाने या प्रणालीत आवश्यक ते बदल करुन विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील माहिती भरता येणार आहे. खासगी उच्च माध्यमिक, डी.एड. महाविद्यालयातील ही माहिती भरता येणार आहे.
ही प्रणाली जानेवारी-2018 पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. या प्रणालीत ऑगस्ट 2017 पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट 2017 व त्यानंतर प्रणालीत समाविष्ट केलेली काही कर्मचाऱ्यांची माहिती आढळून येत नाही. या प्रकारच्या शाळा व कर्मचाऱ्यांची माहिती पुन्हा समाविष्ट करावी लागणार आहे.
शालार्थ आयडी प्राप्त कर्मचाऱ्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशाची प्रत, शालार्थ प्रणालीतील वेतन देयकाची छायाप्रत व त्यामधील त्याचे नाव व शालार्थ आयडी यांची पडताळणी करुन संबंधित कर्मचाऱ्याचे नाव त्वरीत प्रणालीत समाविष्ट करावे. या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊ नयेत, अशा सूचना बालभारतीचे संचालक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.सुनील मगर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांना दिल्या आहेत.
शालार्थ आयडी न मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव घेऊन त्याची छाननी करुन सर्व बाबींची पडताळणी करुन, संच मान्यतेनुसार मंजूर पदानुसारच त्याचे नाव प्रणालीत समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. जुने व नवीन कर्मचारी यांची नोंद तपशीलासह दोन स्वतंत्र नोंदवह्यांमध्ये दिनांकासह करणे आवश्यक आहे.
ही माहिती भरावी लागणार
प्रणालीत नवीन बॅंकेचे नाव व बॅंच समाविष्ट करणे, जन्मतारिख दुरुस्त करणे, पासवर्ड रिसेट करणे, युजर नेम बदलणे, युडायस कोड समाविष्ट करणे, अधीक्षक वेतन पथकांचे पासवर्ड रिसेट करणे, बॅंकेचा आयएफएससी कोड बदलणे आदी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शालार्थ प्रणालीत काम करत असताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्या सोडविण्यात येणार आहेत, असे मगर यांनी स्पष्ट केले आहे.