पुणे – जंगली महाराज आणि फर्गसन रस्त्याला जोडणाऱ्या घोले रस्त्यावर होणारी कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्तुळाकार वाहतुकीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार केला होता. घोले रस्त्यावर सोमवारपासून चक्राकार वाहतूक सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी वाहनचालक चक्रावले.
घोले रस्ता, महात्मा फुले संग्रहालय, आपटे रस्ता चौक मार्ग एमजीएम हॉस्पिटल या मार्गाने चक्राकार वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. घोले रस्त्यालगत असलेल्या छोट्या गल्ल्यांमधून वाहनचालक येत असल्याने आपटे रस्ता, घोले रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांनी वर्तुळाकार वाहतुकीचा प्रस्ताव मांडला आहे. प्रायोगिक तत्त्वावर वर्तुळाकर वाहतूक सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली. घोले रस्त्यालगतच्या गजानन महाराज मंदिर चौकातून घोले रस्ता तसेच मॉडर्न महाविद्यालयाच्या रस्त्याने जाण्यास मनाई करण्यात आली असून तेथे लोखंडी कठडे (बॅरिकेडस्) उभारण्यात आले आहेत. घोले रस्त्यावर सकाळी 9 ते रात्री 8 यावेळेत वाहतूक नियोजनासाठी पोलीस ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना वर्तुळाकार मार्ग अंगवळणी पडल्यानंतर घोले रस्त्यावर महापालिकेकडून कायमस्वरूपी दुभाजक बांधण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
असा असेल वाहतुकीचा मार्ग
झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून येणारी वाहने घोले रस्त्याने महात्मा फुले संग्रहालय, आपटे रस्ता चौक मार्गे एमजीएम हॉस्पिटलच्या दिशेने जातील. आपटे रस्त्याने घोले रस्त्यावर येणारी वाहने आपटे रस्ता चौकमार्गे एमजीएम हॉस्पिटल चौकातून घोले रस्त्यावर येतील. घोले रस्त्यावरून महात्मा फुले संग्रहालयमार्गे महापौर बंगल्याच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे.