पुणे – सख्ख्या भावाच्या घरी घरफोडी करणाऱ्यास युनिट 3 च्या पथकाने जेरबंद केले आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी के ल्याची कबुली दिली आहे. अरिफ शफी शेख ( वय 36, रा.कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी मोसिन शफी शेख (28, रा.कोंढवा) यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा 2 लाख 11 हजारांचा ऐवज चोरण्यात आला होता. बनावट चावीचा वापर करून बेडरुमच्या कपाटातून हा ऐवज चोरण्यात आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास युनिट 2 चे पथक करत असताना पोलीस कर्मचारी विल्सन डिसुझा यांना फिर्यादीचा सख्खा भाऊ अरिफ शेखने हा गुन्हा केल्याची खबर मिळाली होती. तो चोरीचा ऐवज विकण्यासाठी कोळसे गल्ली येथे येणार होता. त्यानुसार अरिफला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांसह 90 ग्रॅम सोन्याचे दागिने 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे हस्तगत करण्यात आले. त्याला लष्कर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली.
पोलीस कोठडीत सखोल तपास करता त्याने भावाच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्याने अशाप्रकारे कुलूप उघडून आणखी काही ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा तपास अपर पोलीस अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे व कर्मचारी विलतसन डिसोझा, सचिन गायकवाड, मच्छींद्र वाळके, गजानन एकबोटे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, सुजित पवार, संदीप राडोड यांच्या पथकाने
केली.
मुलाच्या उपचारासाठी काढले होते कर्ज
फिर्यादी हे फोटोग्राफीचे काम करतात तर आरोपी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्याचा मुलगा मतिमंद असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे त्याने कर्ज काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केली.