पुणे – सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्चितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयांसाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे 22 मेपर्यंत शिबिर घेण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील सर्व अध्यापकीय पदांची 1 जानेवारी 2016 रोजीची वेतननिश्चिती करावयाची आहे. यात या दिनांकादिवशी सेवारत असलेले व यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांचा समावेश आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील वेतन निश्चिती प्रकरणाची संख्या जास्त आहे. वेतननिश्चितीचे कामकाज सूत्रबद्धपणे होण्याकरिता महाविद्यालयांची शिबिरे घेण्याचे नियोजन पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी केले आहे. या शिबिरासाठी जिल्हानिहाय महाविद्यालयांसाठी वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिबिरांना सुरुवातही करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी न्यू आटर्स, कॉमर्स ऍन्ड सायन्य कॉलेजमध्ये गुरुवारपर्यंत (दि.16) शिबिर चालू ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यामधील महाविद्यालयांसाठी के.टी.एच.एम. महाविद्यालय, एस.एन.जे.बी.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि.17), एल.व्ही.एच.महाविद्यालयात शनिवारी (दि.18) शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सोमवार (दि.20) ते बुधवारपर्यंत (दि.22) शिबिर घेण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महाविद्यालयांतील संबंधित काम पाहत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळापत्रकाप्रमाणे आवश्यक दस्तऐवजासह मूळ सेवापुस्तक व विद्यापीठाने करून दिलेल्या वेतननिश्चिती तक्त्यांसह शिबिरास उपस्थित राहून वेतननिश्चितीचे कामकाज पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे, अशा सूचना डॉ. नारखेडे यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.